अनिल अडकिने, सावनेर तालुका प्रतिनिधी
मो नं-९८२२७२४१३६
सावनेर:- तालुक्यातील रायवाडी येथील शेतकरी गंगाधर मारुती गजभिये राहणार रायवाडी तालुका सावनेर पाटबंधारे विभागाच्या हलगर्जीपणामुळे खेकरा नाला धरणाच्या कालव्यात अचानक पाणी सोडण्यात आल्याने बैल जोडी सह कालवा ओलांडतांना शेतकरी वाहून गेल्याची घटना सावनेर पाटबंधारे विभाग खापा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या रायवाडी शिवारात १९ सप्टेंबरला सायंकाळी ६ वा.सुमारास घडली होती.
गंगाधर मारुती गजभिये वय-६० वर्ष ,मु.रायवाडी ता. सावनेर,असे मृतक शेतकऱ्याचे नाव होते.
रायवाडी शिवारात खेकराणाला धरण आहे त्या धरणाच्या सभोवताल रायवाडी येथील शेतकऱ्यांच्या शेती आहे. कालव्यात पाणी नसल्यामुळे गंगाधर गजभिये यांनी बैल जोडीसह कालवा ओलांडत असताना नेमके त्याच वेळेस धरणाचे गेट उघडून पाणी सोडण्यात आल्यामुळे त्या पाण्याच्या अती प्रवाहात गंगाधर गजभिये वाहून गेले.
घटनेची माहिती मृतकाच्या मुलाने धरणाचे वरिष्ठ लिपिक पुरुषोत्तम कुकडे यांना दिली. त्यांनी लगेच उघडलेले दरवाजे बंद केले. तोपर्यंत गंगाधर गजभिये दूरवर वाहून गेले होते. गावकऱ्यांनी शोधण्याचा प्रयत्न केला परंतु रात्र झाल्यामुळे शोध कार्य थांबवावे लागले. २० सप्टेंबरला सकाळपासून रेस्क्यू टीमने पेट्रोल बोटीने कोची धरणात शोध कार्य सुरू केले.परंतु सायंकाळपर्यंत गंगाधर गजभिये यांचा शोध लागला नाही. खापा पोलीस स्टेशनचे ठाणेदार अजय मानकर यांनी हार न मानता २१ तारखेला सकाळपासून रेस्क्यू टीमच्या दोन चमूने शोधकार्य सुरु केले असता आज सकाळी ११ वा. सुमारास लाश तरंगत असताना आढळली. खापा पोलीस स्टेशन अंतर्गत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.
शवविच्छेदनानंतर मृतकांची लाश खापा येथील पाटबंधारे विभागामध्ये नेण्यात आली. शेतकऱ्यांच्या मृत्यूला पाटबंधारे विभागच जबाबदार आहे. मनात येईल तेव्हा दरवाजे उघडून पाणी सोडण्यात येते. पूर्वसूचना गावकऱ्यांना देण्यात येत नाही. पाणी सोडण्यापूर्वी भोंगा वाजविण्यात आला नाही. कदाचित भोंगा वाजविला असता तर शेतकऱ्याने कालवा ओलांडण्याचा प्रयत्न केला नसता. त्याच्या जीव वाचला असता. शेतकऱ्याच्या मृत्यूला पाटबंधारे विभागच जबाबदार आहे. दोषी अधिकाऱ्यांविरुद्ध प्रशासकीय कारवाई करून मृतकाच्या परिवारातील एका सदस्याला पाटबंधारे विभागात नोकरी द्यावी. तसेच दहा लाख रुपये द्यावे. आश्वासन लेखी स्वरुपात द्यावे अशी अट गावकरी, सामाजिक कार्यकर्ते यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यासमोर मांडली. जोपर्यंत लेखी आश्वासन मिळणार नाही तोपर्यंत मृताला पाटबंधारे विभागाच्या ऑफिसमधून आम्ही नेणार नाही. असा इशारा भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते व माझे जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र शेंडे यांनी दिला यावेळी सावनेर तालुका अध्यक्ष देशमुख व गावकरी नागरिक व खापा परिसरातील मंडळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. पुढील तपास खापा पोलीस स्टेशन अंतर्गत सुरू आहे.