रायगड जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन रायगड:- जिल्हातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. खालापूर तालुक्यात असलेल्या अहिल्यानगर येथे एका मुलीने आपल्याच जन्मदात्या आईची निर्घृण हत्या केल्याचा घटनेने संपूर्ण तालुक्यात संताप व्यक्त करण्यात येत आहे. कारण की, मृतक महिलेने मुलीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पाहिले म्हणून या निर्दयी मुलीने आईची हत्या केली. संगीता मारुती झोरे असे हत्या करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, मृतक संगीता झोरे या आपल्या दोन मुलींसह परखंदे अहिल्यानगर गावात राहत होत्या. मंगळवारी पहाटे 4.30 वाजताच्या सुमारास संगीता यांना झोपेतून जाग आली. यावेळी संगीता यांना त्यांची मोठी मुलगी भारती ही तिचा प्रियकर संतोष नांदगावकर याच्यासोबत नको त्या अवस्थेत दिसली.
यावेळी मृतक संगीता यांनी आरडाओरडा करण्यास सुरवात केली. यावेळी संतोषने त्यांचे तोंड दाबून त्यांना जमिनीवर खाली पाडले. त्यानंतर संगीताच्या तोंडावर घरातील ब्लँकेट दाबून धरले. तर भारतीने आईचे पाय पकडले. श्वास कोंडल्याने संगीता यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
त्यानंतर आरोपी मुलीने आणि तिच्या प्रियकराने संगीता यांची हत्या झाल्याचे लपवण्यासाठी आरोपींनी साडीने घराच्या छताच्या लोखंडी पाईपला मृतदेह लटकवला. तसेच पायाजवळ लाकडी स्टूल ठेवून हत्येला आत्महत्या दाखवण्याचा प्रयत्न केला. पण घटना घडली तेव्हा संगीता यांची लहान मुलगीही तेथे उपस्थित होती. लहान मुलीने सर्व घडला प्रकार नातेवाईकांना सांगितला. यानंतर ही हत्येची घटना उघडकीस आली.
नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार खालापूर पोलीस ठाण्यात भारती झोरे आणि तिचा प्रियकर संतोष नांदगावकर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे. अधिक तपास खालापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन पवार करत आहेत.