मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिराेली:- जिल्हातील देसाईगंज तालुक्याच्या बाेळधा या गावातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. ऊसाच्या शेतीत जिवंत विद्युत प्रवाह साेडलेला तारांना स्पर्श झाल्याने 11 व्या वर्गात शिकणाऱ्या एका मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना साेमवार 16 सप्टेंबर राेजी दुपारच्या सुमारास घडली. आकाश दुर्वास गायकवाड वय 17 वर्ष रा. महागाव, जिल्हा. गाेंदिया, असे मृतक मुलाचे नाव आहे.
देसाईगंज तालुक्यातील बोळधा येथे शेतकरी दुर्वास गायकवाड यांची शेती आहे. त्यांच्या शेतात धान पीक लावलेले आहे. आकाश गायकवाड हा गोंदिया जिल्ह्यातील महागाव येथील कनिष्ठ महाविद्यालयात शिकत हाेता. 16 सप्टेंबरला शाळेला सुट्टी असल्याने तो घरी आला होता. त्यामुळे शेतातील धानाला पाणी देण्यासाठी आकाश व त्याचा चुलत भाऊ दोघेही शेतात गेले हाेते. आकाश हा शेतात पाणी देऊन घराकडे निघाला असताना गुणाजी मन्साराम गायकवाड या शेतकऱ्याच्या शेतीच्या धुऱ्यावरून येत हाेता. लगतच ऊसाची शेती असलेल्या याच धुऱ्यावर तारांच्या कंपाउंडमध्ये विद्युत प्रवाह साेडलेला हाेता. याच तारांना स्पर्श झाल्याने आकाशचा जागीच मृत्यू झाला. आकाश हा आईवडिलांना एकुलता मुुलगा हाेता. त्यामुळे त्याचा कुटुंबावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे.
या घटनेनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळ दाखल झाले. यावेळी पोलिसांनी मोका पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी देसाईगंज ग्रामीण रुग्णालयात पाठविला. दरम्यान, पोलिसांनी गुणाजी मन्साराम गायकवाड व मुलगा उमाजी गुणाजी गायकवाड या पिता पुत्राला अटक केली. पुढील तपास पोलिस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.