✒️युवराज मेश्राम, विदर्भ ब्यूरो चीफ
नागपूर:- आधुनिक तंत्रज्ञानामुळे जरी निरनिराळ्या क्षेत्रात नोकरीच्या नवनवीन संधी प्राप्त होत असल्यातरी अशा संधीची संख्या ही अल्प आहे. तसेच वाढत्या लोकसंख्येमुळे व इतर कारणांनी प्रत्येकाला नोकरी मिळणे शक्य नाही. अशा परिस्थितीत जे बेरोजगार उमेदवार स्वयंरोजगार करण्यास इच्छूक आहेत अशा बेरोजगार उमेदवारांना शासनाच्या विविध योजनांची व कर्ज पुरवठा करणाऱ्या विविध महामंडळाच्या योजनांची माहिती एका छत्राखाली होण्याकरिता रोजगार मेळावा घेण्याचे योजिले आहे.
सदर मेळावा जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, शासकीय इमारत क्रमांक 2, 2रा मजला सिव्हील लाईन्स, नागपूर येथे दि. 28 सप्टेंबर रोजी दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत घेण्यात येणार आहे. सदर मेळाव्यास निरनिराळे महामंडळाचे व्यवस्थापक व शासकीय अधिकारी हे त्यांच्या महामंडळाची माहितीसह मेळाव्यास हजर राहणार आहे. या संधीचा स्वयंरोजगार इच्छूक बेरोजगार युवक व युवतींनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.