हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- जिल्ह्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थी/ विद्यार्थीनींच्या सुरक्षा विषयक उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी मुख्याध्यापकांना दिल्या आहेत.
यात प्रामुख्याने 1) सर्व शाळा व परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे. 2) शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या नियुक्तीच्या अनुषंगाने काळजी घेणे (चारित्र्य पडताळणी व मानसशास्त्रीय चाचणी करण्यात यावी.) 3) सर्व व्यवस्थापनाच्या, सर्व माध्यमाच्या शाळांमध्ये तक्रार पेटी बसविणे. 4) सखी सावित्रीच्या समितीच्या तरतुदीचे पालन करणे. 5) विद्यार्थी सुरक्षा समिती सर्व शाळांमध्ये व तालुकास्तरावर गठीत करणे, या सुचनांचा समावेश आहे.
तसेच शाळेमधील काम करणाऱ्या सर्व शिक्षक/ शिक्षकेत्तर कर्मचा-यांच्या नावांची व मोबाईल नंबरची यादी शाळेच्या दर्शनीय भागात लावावी. विद्यार्थी सुरक्षेसाठी असणारे 1098, 112 आदी हेल्पलाईन क्रमांक दर्शनीय भागात लावावे व याची माहिती विद्यार्थ्यांना अवगत करुन द्यावी.
सर्व विद्यार्थ्यांना सुरक्षीतपणे व भयमुक्त शिक्षण घेण्याचा अधिकार आहे. व आरटीई ॲक्ट 2009 नुसार देण्याचे आपले कर्तव्य आपले आहे. भीतीपोटी विद्यार्थी तक्रार दाखल करण्याचे किंवा अभिव्यक्त होत नसल्याची बाब काही ठिकाणी निदर्शनास आली आहे. विद्यार्थ्यांना अंमली पदार्थ (ड्रग्स, दारु,गांजा, तंबाखु, सिगारेट, बिडी –तंबाखु, खर्रा, गुटखा इत्यादी) व्यसनांपासून दूर ठेवणे, मोबाईलचा अतिवापरामुळे होणाऱ्या दुष्परिणामा पासून दूर ठेवणे, तसेच शारिरीक बदलामुळे कमी वयात मुले/मुली बिघडण्यापासून वाचविणे, भविष्यात एक सुजाण नागरीक घडवून शाळेचे, जिल्ह्याचे नाव उंचावण्याकरीता विद्यार्थ्यांवर मेहनत घेणे ही आपली जबाबदारी आहे.
शाळेतील विद्यार्थ्यांच्या लहानात लहान समस्या जाणून घेण्याकरीता तक्रार पेटीचा वापर करावा. या करीता आवश्यकतेनुसार तज्ज्ञ समुपदेशक नेमूण विद्यार्थ्यांचे समपुदेशन करावे. प्रत्येक विद्यार्थ्यांस आठवड्यातील एक दिवस तक्रार किंवा सूचना नोंदणी करण्याकरीता अनिवार्य करावे, जेणेकरून विद्यार्थी अभिव्यक्त होवून त्यांची भिती जाईल. तक्रार पेटीतील प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांच्या तक्रारी / सूचना याबाबत शासन निर्णय 5/5/2017 अन्वये कार्यवाही करावी. तसेच सदर तक्रारी/ सूचनांचे अवलोकन करून विद्यार्थ्यांच्या हिताशी निगडीत असणाऱ्या बाबींचे निरसन शाळास्तरावरून करावे. गंभीर स्वरुपाची बाब असल्यास संबंधित गट शिक्षण अधिकारी, शिक्षण अधिकारी, पोलीस विभाग यांच्याशी संपर्क साधून सदर बाब निर्देशास आणून द्यावी, असेही जिल्हाधिका-यांच्या आदेशात नमुद आहे.