वैशाली गायकवाड पुणे प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे, ०६:- स्त्री शक्तीचा जागर करणारा सण म्हणजे नवरात्र. या सणाचे औचित्य साधत पुण्यातील ‘स्त्री जागर समिती’च्यावतीने ‘मेरी रातें, मेरी सड़के’ कार्यक्रमाची तिसरी रात्र उत्साहात साजरी केली. ‘दुर्गे तुझ्या शक्तीने भय इथले संपवायचे आहे’ असं म्हणत दुर्गेच्या या लेकी कोरेगाव पार्कमधील फुटपाथवर मनसोक्त, निर्भयपणे गरब्याच्या तालावर थिरकल्या. याप्रसंगी महिलांनी कविता आणि गाणी गायली व महिला म्हणून जगताना आलेले अनुभव सर्वांसमोर मांडले.
नवरात्राच्या काळात अनेक ठिकाणी गरबा/दांडियाचे कार्यक्रम होत असतात. मात्र कोरेगाव पार्कमधील फूटपाथवर झालेला हा गरब्याचा कार्यक्रम जरा हटके होता. कारण येथे उपस्थित महिलांना फक्त मनोरंजनासाठीच नाही तर स्त्री मुक्तीसाठी, सुरक्षेसाठी गरबा खेळला. याप्रसंगी बोलताना, महिलांवर होणारे अत्याचार संपवायचे असतील तर मुलींवर बंधन आणण्यापेक्षा आपल्या घरातील मुलांना महिलांचा सन्मान करायला शिकवायला पाहिजे, असं प्रतिपादन गुलाबो गँगच्या संस्थापक श्रीमती. संगीता तिवारी यांनी केले. दुर्गेनी कुठलाही अन्याय सहन केला नाही, दुर्गेसारखी लढायची शक्ती आपल्यात या नवरात्रात मिळो, अशा शुभेच्छा देत अभिव्यक्तीच्या समन्वयक अलका जोशी यांनी नवरात्र आणि महिलांच नात समजावून सांगितलं.
महिला सुरक्षा हा पर्याय नाही तर गरज आहे. प्रत्येक महिलेने स्वतःच्या सुरक्षेची काळजी घेण्यासाठी ज्याठिकाणी त्यांना असुक्षित वाटतं त्याठिकाणी त्यांनी बोलायला सुरूवात करावी, असे मत सामाजिक कार्यकर्त्या मृणालिनी वाणी यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमात पुणे शहर काँग्रेस अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी उपस्थित राहून महिलांना शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी महिला पोलिस कर्मचाऱ्याचा सत्कारही करण्यात आला. ‘ओय नजर संभाल’, ‘महिलां वरील हिंसाचार आता बस’, असा सामाजिक संदेश देणारे टि-शर्टही बनविण्यात आले होते. ‘दुर्गेच्या लेकीला काय पाहिजे,कालीच्या लेकीला काय पाहिजे,समाजात हिंसा नाही पाहिजे’ ,अशा दमदार घोषणाही यावेळी देण्यात आल्या.यावेळी वकील असुंता पारधे यांनी आपले अनुभव उपस्थितांसमोर मांडले. सगुणा महिला संघटनेचे शोभा करांडे यांनी उपक्रमाच्या पुढील कार्यक्रमाची माहिती दिली. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जीविका उथडा यांनी केले.
दिल्लीतील निर्भया प्रकरणाला यावर्षी 12 वर्षे होत आहेत. त्यानिमित्त महिला जागर समितीद्वारे ‘मेरी राते मेरी सडके’ हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. पुण्यात आणि राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये समितीद्वारे हा उपक्रम 21 सप्टेंबर पासून 14 डिसेंबरपर्यंत राबविण्यात येणार आहे. या उपक्रमात महाराष्ट्रातील विविध स्त्री संघटना आणि संस्था सहभागी होत आहेत.