युवराज मेश्राम प्रधान संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. आता उमेदवार वस्ती वस्तीत जाऊन मतदार राजाला खुश करून मतदान मागणार आहे. पण स्वातंत्र्याचा इतक्या वर्षानंतर ही मागील भटक्या विमुक्त जमातील नागरिकाच्या साधे साधे प्रश्न राजकीय पक्षांच्या पुढाऱ्यांनी सोडविले नाही. त्यामुळे भटक्या विमुक्त जमातील नागरिकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
विदर्भात भटक्या विमुक्त जमातीच्या अनेक वस्तात सध्या झळकत असलेल्या बॅनरने या समाजाची खदखद दिसून येत आहे. साधे जातीचे प्रमाणपत्र मिळत नाही, मग याेजनांचा लाभ मिळणे तर शेकडाे मैल दूर आहे, अशी भावना मांडत आमच्या वस्तीत कुठल्याही राजकीय पक्षाने मतदान मागायला येऊ नये, अशी खदखद वस्तीच्या नागरिकांनी व्यक्त केली आहे.
विदर्भातील भटक्या विमुक्त जमातीच्या अशा अनेक वस्त्यांमध्ये असे बॅनर लावण्यात आल्याची माहिती आहे. साहेब आम्ही भारतीय आहोत आणि भटक्या विमुक्त जमाती मध्ये येतो. या जमातीकडे कोणतीही जमीन नाही, त्यामुळे महसूल पुरावा कोठून आनणार? आजाेबा, पणजोबा, वडील यांनी कधी शिक्षण घेतले नाही, मग त्यांच्या जातीची नोंद कोठून आणावी, अशी उद्विग्नता या वस्त्यांमधील नागरिकांनी व्यक्त केली. आता मुलं मोठी झाली, शिकायला लागली, त्यांना शासकीय योजनेचा लाभ मिळावा, आम्हला घरकुल मिळावे, यासाठी सर्वत्र जातीचे प्रमाणपत्र मागितले जातात. यासाठी अनेकदा जिल्हाधिकारी, तहसीलदार, आमदार, खासदार, नगरसेवक, समाजकल्याण अधिकारी यांचे उंबरठे चालून चप्पल झिजले आहेत, तरी प्रमाणपत्र मिळाले नाही. त्यामुळे आमची जात कोणती ते तरी ठरवून दया आणि त्याचे प्रमाणपत्र दया, अशी आर्त मागणी सर्व भटके विमुक्त जमातीच्या लाेकांनी केली आहे.
आता निवडणुकीचा वेळ आल्याने सर्व पक्षाचे उमीदवार घेऊन वस्तीत येणार. मात्र आयुष्याचे साधे प्रश्न सुटत नसतील तर या लाेकशाहीचा लाभ काय? आमची जात वैध नाही, तर मग आमचे मतदान कसे वैध, असा उद्विग्न सवाल हे नागरिक करीत आहेत. त्यामुळे काेणत्याच पक्षाच्या उमेदवारांनी मतदान मागायला आमच्या वस्तीत येऊ नये आणि आपला फुकट वेळ गमावू नये असे फलक सर्वत्र विदर्भात वस्तीवर लावल्याचे दिसत आहे.