कवी लेखक: प्रा. विलास डोईफोडे,
राह. सावनेर 9112857299
तुझी फुले तुलाच वाहतो
स्वार्थ यात मी माझा पाहतो
शब्द तुझे स्वरसाज तुझा,
काळवेळ ही तुझी
भूपाळीचा सुर मी आळवितो
तुझी फुले तुलाच वाहतो
श्रीफळ तुझे बेलपत्र तुझेच,
अबीर गुलाल तुझा
विधात्यास श्रद्धेने मी पुजितो
तुझी फुले तुलाच वाहतो
समिधा तुझी तूप ताप तुझा,
श्वेतचंदनही तुझेच
यज्ञात या आहुती मी अर्पितो
तुझी फुले तुलाच वाहतो
झरा तुझा सरिता तुझीच,
प्रचंड प्रपात ही तुझा
जल अभिषेक मी करवितो
तुझी फुले तुलाच वाहतो
गंध तुझा प्राणवायू देशी तू,
वाऱ्यालाही गती तुझी
श्वास मात्र मोकळा मी ओढतो
तुझी फुले तुलाच वाहतो
क्षितिज तुझे किरणे तुझीच,
रंग ही उधळीशी तू
नजरेचे पारणे मी फेडतो
तुझी फुले तुलाच वाहतो
मृदा निर्मिली अंकुर तुझेच,
पाऊसधाराही तुझ्या
शिवारात उभे पीक मी कापतो
तुझी फुले तुलाच वाहतो
उमगले आता आहे जे दृष्टीस,
माझे काय या सृष्टीत
मी तर व्यर्थ अभिमान ठेवतो
तुझी फुले तुलाच वाहतो
गर्वाचे हरण निसर्गाचे रक्षण
या वचनाला मी सार्थ जागतो
तुझी फुले तुलाच वाहतो
स्वार्थ यात मी माझा पाहतो!!