सौ. हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा प्रतिनीधी मो.9764268694
चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात भाजप-महायुतीचे उमेदवार म्हणून सुधीर मुनगंटीवार रिंगणात आहेत. तर काँग्रेस महाविकास आघाडीकडून संतोषसिंग रावत आणि पूर्वाश्रमीच्या काँग्रेस कार्यकर्त्या आणि अपक्ष उमेदवार डॉ. अभिलाषा गावतुरे मैदानात आहेत. एकीकडे बलाढ्य मुनगंटीवार आणि दुसरीकडे विधानसभेच्या रिंगणात नवीन नेते, अशी ही लढत आहे. महाराष्ट्रात तीनवेळा भाजप सत्तेत आले आणि मुनगंटीवार तिन्ही वेळा महत्त्वाच्या खात्यांचे मंत्री राहिले. त्यांच्याविरोधात लढणाऱ्या दोन्ही उमेदवारांना संस्था-संघटनांच्या पलीकडे पदं मिळवता आली नाहीत.
अभिलाषा गावतुरे यांनी बंडखोरी केलेली आहे. त्यामुळे काँग्रेसची परंपरागत मते त्यांना मिळणार नाहीत, हे स्पष्ट आहे. पण गेल्या वर्षभरापासून काँग्रेसमध्ये काम केल्यामुळे काही अंशी काँग्रेसची मतं आपल्याकडे वळवण्यात यशस्वी ठरू, असे त्यांना वाटत आहे. या निवडणुकीत लोकसभेप्रमाणे जात हा मुद्दा राहणार नाहीये. त्यामुळेच विरोधकांची अडचण होत आहे. पण काहीही केले तरी निवडणुकीत जात हा मुद्दा लावून धरण्याचा प्रयत्न सुरू आहे.
काँग्रेसचीही काही मते अभिलाषा गावतुरे आपल्याकडे वळवतील, असे राजकीय जाणकार सांगतात. त्यामुळे याचा फटका काँग्रेसचे उमेदवार संतोषसिंग रावत यांना बसेल, हे स्पष्ट आहे.
नव मतदार विकासाच्या व्हिजनसोबत*
मतदारसंघात भाजपचे परंपरागत मतदार आहेत. त्यामुळे भाजप महायुतीचे उमेदवार मुनगंटीवार यांना ही मते मिळणारच आहेत. या व्यतिरिक्त नव्याने जुळलेला युवा मतदार विकासाच्या व्हिजनमुळे मुनगंटीवार यांच्यासोबत आहे. गावतुरे आणि रावत यांच्यात जी लढाई आहे, ती दुसऱ्या क्रमांकासाठी आहे, हे स्पष्ट आहे. याचे कारण मतदारसंघात झालेल्या विकासकामांमध्ये दडलेले आहे.
हे काम मुनगंटीवारच करू शकतात*
सुधीर मुनगंटीवार यांना या मतदारसंघात 15 वर्षे कामाचा अनुभव आहे. त्यापूर्वी 15 वर्ष ते चंद्रपूर मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी होते. सत्ता नसतानाही त्यांनी कामे कशी खेचून आणली, हे बल्लारपूर मतदारसंघातील लोक आजही आवर्जून सांगतात. त्यांच्या अनुभवाचा आणि राज्यातील वजनाचा पुरेपूर फायदा येत्या 5 वर्षांत मतदारसंघाला होणार आहे. विकासनिधी असो, उद्योग असो, पायाभूत सुविधा, सिंचन, कृषी, पर्यटन असो किंवा रोजगार असो.. हे काम मुनगंटीवारच करू शकतात, याची पूर्ण जाणीव मतदारांना आहे.
समस्या सोडवण्याची क्षमता
2014 ते 2019 या काळात मुनगंटीवार अर्थमंत्रीसुद्धा राहीलेले आहे. हा दांडगा अनुभव त्यांच्याजवळ आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या तिजोरीची चावी जिल्ह्याच्या दिशेने कशी फिरवायची, हे त्यांना चांगले ठाऊक आहे. ‘त्या तिजोरीचा पासवर्ड अजूनही माझ्याकडे आहे’, असे ते नेहमी सांगत असतात. त्यामुळे मुनगंटीवार पुन्हा आमदार झाल्यास शेतकऱ्यांचे, बेरोजगारांचे प्रश्न आदी राहिलेली काही कामे ते निश्चितपणे पूर्ण करतील, असा विश्वास मतदारसंघातील जनतेला आहे. अशा एकूणच परिस्थितीत बल्लारपूरच्या विकासाचे शत्रू म्हणून उभे ठाकलेले ‘भल्लालदेव’ यांच्याकडे चाचपडण्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही, असेच चित्र आहे.