आमदार सुधीर मुनगंटीवार यांची अधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीत सकारात्मक चर्चा.
सौ. हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा प्रतिनीधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुल, दि.28:- मुल तालुक्यात खाणकाम व्यवसायावर आधारित उद्योग व्यवसाय सुरू होत आहेत. त्यामुळे उद्योगांना कुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावे आणि स्थानिक युवकांना रोजगार मिळावा यासाठी मुल येथे शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय सुरू करावे, अशी मागणी राज्याचे वने व सांस्कृतिक कार्य मंत्री व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली आहे.
यासंदर्भात बुधवारी (ता.२७) मुंबई येथे मंत्रालयात उच्च व तंत्र शिक्षण सहसचिव संतोष खोरगडे यांच्यासोबत बैठक घेऊन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील तसेच उच्च व तंत्रशिक्षण प्रधान सचिव यांच्याशी सुधीर मुनगंटीवार यांनी फोनवर सकारात्मक चर्चा केली.
चंद्रपूर जिल्हात ठिकठिकाणी खाणीचे उत्खनन सुरू असल्याने या जिल्ह्याला औद्योगिक जिल्हा म्हणून ओळख प्राप्त आहे. मुल तालुक्यामध्ये खाणकाम व्यवसाय व त्यावर आधारित उद्योग सुरू होत आहेत. त्यामुळे या उद्योगांना कुशल मनुष्यबळाची मोठ्या प्रमाणात गरज भासू लागली आहे. परंतू या ठिकाणी उच्च तांत्रिक शिक्षणाची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे उद्योगांना स्थानिक कुशल मनुष्यबळ उपलब्ध होण्यास अडचणी निर्माण होत आहेत. उच्च व तांत्रिक शिक्षण घेण्यासाठी तालुक्यातील युवकांना इतर शहरांमध्ये जावे लागते. त्यामुळे या विद्यार्थ्यांची शिक्षणासाठी गैरसोय होत आहे. परिणामी स्थानिक विकासावर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे उद्योगासाठी कुशल मनुष्यबळाची आवश्यकता तसेच स्थानिक युवकांना तांत्रिक शिक्षण मिळून रोजगार उपलब्ध होण्याच्या अनुषंगाने मुल येथे एक शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय सुरू करण्याबाबत योग्य कार्यवाही करावी, अशी मागणी सुधीर मुनगंटीवार यांनी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांना केली.
यासंदर्भात सुधीर मुनगंटीवार यांच्यासोबत फोनवर झालेल्या चर्चेला चंद्रकांत पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद दर्शविला. तसेच प्रशासनाला पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांमुळे लवकरच मुल येथील पॉलिटेक्निक कॉलेजचा मार्ग मोकळा होणार आहे.