मधुकर गोंगले, अहेरी तालुका प्रतिनिधी
अहेरी:- मृणाल लक्ष्मण रत्नम याने वैद्यकीय अभ्यासक्रमात बी. डी. एस. ला प्रवेश मिळविल्याने जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक सहकारी पत समिती, अहेरी कडून आयोजित वार्षिक सर्वसाधारण सभेत पतसंस्थेचे अध्यक्ष राजू आत्राम व संचालक विश्वनाथ वेलादी यांच्या शुभहस्ते त्याचा जाहीर सत्कार करण्यात आला.
जिल्हा परिषद शाळेतून प्राथमिक शिक्षणाचे धडे घेतलेल्या आणि मूळच्या अहेरी तालुक्यातील छल्लेवाडा या छोट्याशा गावातील मृणाल याने उच्च माध्यमिक शिक्षण आबासाहेब गरवारे महाविद्यालय, पुणे येथे पूर्ण करून NEET साठी नांदेड गाठले. नांदेड येथे NEET ची परीक्षा देत उत्तम यश संपादन करून अमरावती येथील व्ही. वाय. डब्ल्यू. एस. डेंटल कॉलेज मध्ये बी. डी. एस. ला प्रवेश मिळविला. त्यामुळे मृणालवर त्याच्या नातेवाईक व मित्रमंडळी कडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
मृणाल याने केवळ शैक्षणिक क्षेत्रात आपली चुणूक दाखवून थांबलेला नाही तर नृत्य, चित्रकला आणि काव्य लेखन या क्षेत्रात सुद्धा त्याचा हातखंडा आहे. शिक्षकी पेशेत असलेले त्याचे वडील श्री लक्ष्मण रत्नम आणि आई सौ. वंदना रत्नम यांनी त्याच्या यशाबद्दल समाधान व्यक्त केले आहे. बी. डी. एस. नंतर एम. डी. एस. पूर्ण करण्याचा मानस असल्याचे बोलून दाखवीत मृणालने आपल्या यशाचे श्रेय आई, बाबा, गुरुजन व मित्र-मंडळींना दिलेला आहे.