पत्रकार परिषद घेऊन जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी दिली माहिती.
मुकेश चौधरी, कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- नुसत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत हिंगणघाट विधानसभा मतदार संघात महाविकास आघाडी व राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाच्या अधिकृत उमेदवार अतुल वांदिले यांच्या विरोधात बंडखोरी केल्याने पक्षाने कठोर कारवाई करत माजी आमदार राजु तिमांडे आणि हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुधीर कोठारी यांना पक्षातून निलंबित केले आहे.
माजी आमदार राजु तिमांडे यांनी पक्षाने दिलेले अधिकृत उमेदवार असतानाही अपक्ष उमेदवारी दाखल करत पक्षाच्या निर्देशांचे उल्लंघन केले. तसेच सुधीर कोठारी यांनी पक्षाचे अधिकृत कामकाज न करता बंडखोरीचे समर्थन केले. या दोघांच्या कारवाया पक्षशिस्तीला धोका पोहोचविणाऱ्या असल्याने ही कठोर कारवाई करण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि प्रदेश सरचिटणीस रवींद्र पवार यांनी ही निलंबनाची घोषणा केली आहे. पक्षाच्या वचनबद्धतेला प्राधान्य देत अशी कारवाई भविष्यातही करण्यात येईल असे पक्षाने स्पष्ट केले आहे. अशी माहिती जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी दिली.
यावेळी पत्रकार परिषद मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले, जिल्हा उपाध्यक्ष अशोक वांदिले, ओबीसी जिल्हाध्यक्ष प्रशांत घवघवे, जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे, तालुका अध्यक्ष विनोद वानखेडे, शहराध्यक्ष बालु वानखेडे, अमोल बोरकर, जिल्हा परिषद सदस्य मिलिंद कोपुलवार, विजय तामगाडगे, राहुल वानखेडे, अनिल आडकीने, प्रवीण कलोडे उपस्थित होते.