त्यापूर्वी कळमेश्वर येथील आरोग्य केंद्रात सुद्धा अशाच पद्धतीनं बनावट औषधांचा साठा आढळून आला होता.
युवराज मेश्राम प्रधान संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- येथील मेडिकल कॉलेज मधून एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. मेडिकल कॉलेज मध्ये मोठ्या प्रमाणात बनावट औषधांचा पुरवठा होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. बनावट औषधांचा पुरवठा करून हजारो रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरु असल्याचं चित्र दिसून येत आहे. याप्रकरणी पोलिसांनी छापेमारी केली असून सुमारे 70,000 पेक्षा अधिक बोगस औषधी जप्त केली आहेत. तसंच याप्रकरणी अजनी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकं काय आहे प्रकरण? नागपूर येथील मेडिकल कॉलेजमध्ये विदर्भासह राज्यातील इतर भागातून रोज हजारो रुग्ण उपचारासाठी येत असतात इतक्या मोठ्या रुग्णालयात 77,370 बनावट औषधाच्या गोळ्यांचा पुरवठा मिळून आला आहे. रेसिपी 500 नावाची एक अँटिबायोटिक आहे, यामध्ये सिप्रोफॉक्ससीन नावाचं औषध नसल्यानं ते बोगस असल्याचं निष्पन्न झालं आहे. 6 जुलै 2023 ते 21 जुलै 2023 या कालावधीत या गोळ्यांचा पुरवठा करण्यात आला होता. त्यापूर्वी कळमेश्वर येथील आरोग्य केंद्रात सुद्धा अशाच पद्धतीनं बनावट औषधांचा साठा आढळून आला होता.
दरम्यान, हे अत्यंत गंभीर प्रकरण उघडकीस आल्यानं याप्रकरणी नागपुरातील अजनी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी भिवंडी, नांदेड, वर्धा या ठिकाणी सुद्धा बनावट औषधांच्या साठ्या प्रकरणी गुन्हे दाखल झाले आहेत.
बनावट औषधांचा पुरवठा: राज्यात मोठ्या प्रमाणात रुग्णालयात बनावट औषध पुरवठा होत असून रुग्णाच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचे प्रकरण खूप गंभिर आहे. या प्रकरणी सरकारने कडक पावले उचलणे गरजेचे आहे असे मत नागरिकांनी व्यक्त केली आहे.