अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- आरोग्यविषयक समस्या कोणतीही असो गावंगाड्यातील जनतेला अशा वेळी आठवतो तो रुग्णमित्र गजूभाऊ कुबडे.
काल हिंगणघाट तालुक्यातील वाघोली येथील जिल्हा परिषद शाळेतील वय वर्ष 6 ते 13 या वयोगटातील 57 विध्यार्थीवर्गासह दोन शिक्षकांना शाळेतील मोट व खिचडी खाल्ल्याने विषबाधा झाली. रात्री सर्वांना उलटी, मळमळ व तापाची लक्षणे आढळून आली. गावातील भयंग्रस्त नागरिकांनी सर्वप्रथम फोन केला तो रुग्णमित्र या नावाने प्रसिद्ध असलेल्या गजू कुबडे या व्यक्तीला. गजूने तात्काळ रात्री 8 वाजता रुग्णालय गाठले. तो पर्यंत पेशन्ट रुग्णालयात यायचे होतेच त्यांनी तातडीने प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रविणा गुजर यांच्याशी संपर्क करून या प्रकाराची माहिती दिली त्या त्वरित अलर्ट मोड वर आल्या. तातडीने सर्व यंत्रणा उपलब्ध करून ठेवण्यात आली आणि त्यानंतर मिळेल त्या वाहनाने आपल्या कच्च्या बच्च्याना घेऊन रडवेल्या अवस्थेत त्या मुलांचे पालक व अन्य नातेवाईक व गावाकऱ्यांनी उपजिल्हा रुग्णालयात एकच गर्दी केली.
हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालयात आधीच अपुरी वैद्यकीय व्यवस्था असतांना डॉ. प्रविणा गुजर, डॉ. विशाल रुईकर, डॉ. भेंडे, डॉ. समीर पाटील, डॉ. भोयर यांनी तातडीने या मुलांवर उपचार सुरु केले. काहीं रुग्णाना आज सुट्टी देण्यात आली. जवळपास 57 बालकांना भरती करण्यात आले होते. उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर यांच्या अविरत प्रयत्नामुळे आज सर्व मुले ही धोक्याच्या बाहेर असून सध्या रुग्णालयात 6 ते 13 वयो गटातील 39 बाल रुग्ण उपचार घेत आहेत. या सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे डॉ. प्रविणा गुजर यांनी सांगितले.
आज दुपारी या उपजिल्हा रुग्णालयाला भेट दिली त्यावेळी असंख्य लेकरांचे माय – बाप छोटेसे रडवेले चेहरे करून आपल्या पिला जवळ खिन्न मनाने बसून होते. व थोडीशीही लेकराने कड फिरविली तर आशेने गजूभाऊ म्हणत हाक मारीत होते. एका खासगी रुग्णालयात भरती असलेले मुख्याध्यापक अरुण पोहाणे यांनी डोळ्यात पाणी आणत गजूभाऊ तुम्ही खरच देव माणूस आहात म्हणत हात जोडले.
आज उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर आणि सर्व स्टॉफ यांनी अथक परीश्रम करून या बालकांना नवजीवन दिलेच परंतु या रुग्णालयात भरती असलेले प्रत्येक रुग्ण मात्र आज कृतज्ञतेने गजू भाऊचे नाव घेत होता. मात्र कोणतेही फोटो सेशन किंवा व्हिडीओ तयार करण्यात वेळ घालविण्या ऐवजी केवळ रुग्णाला त्वरित मदत मिळावी यासाठी आपल्या घरचे रुग्ण आहे ह्या भावनेने संपूर्ण रात्रभर जागत मुलांना बर वाटावं म्हणून कळकळीनं रुग्णसेवा करणाऱ्या ह्या अवलीया रुग्ण मित्रासाठी एक सलाम बनतोच.!