आसमा सय्यद पुणे जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- पुण्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. पुण्यातील भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाची 9 डिसेंबर 2024 रोजी निर्घृण हत्या करण्यात आली होती. सतीश वाघ त्यांचे नाव होते. हे हत्याकांड समोर आले होते तेव्हा पुण्यात खळबळ उडाली होती. या हत्याकांडा प्रकरणी तपास करीत असताना पोलिसांना महत्वपूर्ण माहिती मिळून आली आहे.
सतीश वाघ यांच्या हत्येचा उलगडा करण्यात पोलिसांना यश पोलिसांना यश आले आहे. सतीश वाघ यांच्या घरातील त्यांच्या जीवनसंगिनी असलेल्या पत्नीनेच त्यांच्या हत्येची सुपारी दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्रेम प्रकरणातून हा सर्व प्रकार घडल्याचे पुढे येत आहे. पोलीस तपासात या बाबी समोर आल्या आहेत. या घटनेप्रकरणी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने सतीश वाघ यांच्या पत्नीला अटक केली आहे.
भाजप आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ हे उद्योजक होते. ते 9 डिसेंबरला पहाटेच्या सुमारास ते मॉर्निंग वॉकसाठी गेले होते. या वेळी ब्ल्यू बेरी हॉटेल बाहेर चारचाकी वाहनातून आलेल्या चार जणांनी त्यांना जबरदस्ती गाडीत बसवत त्यांचं अपहरण केलं होतं. ही अपहरणाची घटना सीसीटीव्हीत कैद झाली होती. या प्रकरणी हडपसर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांकडून त्यांचा शोध सुरु होता. या दरम्यान त्याच दिवशी रात्री एका ठिकाणी घाटात सतीश वाघ यांचा मृतदेह सापडला होता. सतीश वाघ यांची अपहरणानंतर लगेच त्याच गाडीत चाकूने भोसकून, 72 वेळा वार करुन हत्या केल्याची माहिती समोर आली होती. या प्रकरणी पोलिसांचा युद्ध पातळीवर तपास सुरु होता.
पोलिसांनी अशा प्रकारे केला तपास?
हे हत्याकांड समोर आल्या नंतर विरोधकांकडून सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला जात होता. तर दुसरीकडे पोलिसांचा तपास सुरु होता. पोलिसांनी या हत्या प्रकरणी 4 आरोपींना अटक केली होती. यासाठी पोलिसांनी पुणे-सोलापूर मार्गावरील शेकडो सीसीटीव्ही फुटेज तपासले होते. या तपासातून 4 आरोपींना अटक करण्यात आली. यानंतर सतीश वाघ यांच्या शेजारी राहणाऱ्या भाडेकरुने त्यांच्या हत्येची सुपारी दिल्याची माहिती समोर आली होती. आरोपी भाडेकरुने सतीश वाघ यांच्या हत्येसाठी आरोपींना 5 लाख रुपये दिल्याची माहिती समोर आली होती.
या प्रकरणी पोलिसांनी तपास करत धाराशिवमधून एका आरोपीला नुकतंच अटक केली होती. त्याच्या चौकशी नंतर आता पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाल्याची शक्यता आहे. सतीश वाघ यांच्या पत्नीनेच प्रेम प्रकरणातून आपल्या पतीच्या हत्येची सुपारी दिली होती, अशी धक्कादायक माहिती आता पोलीस तपासातून समोर आली आहे.