मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील हिंगणघाट रेल्वे स्थानकावर 25 डिसेंबर 2024 रोजी स्टेशन सल्लागार समितीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत स्थानकाच्या विकासासाठी प्रवाशांच्या विविध समस्या आणि मागण्यांवर चर्चा करण्यात आली. वर्धा-बल्लारशाह यात्री संघाचे अध्यक्ष राजेश कोचर आणि सदस्यांनी सोयीस्कर प्रवासासाठी नवीन रेल्वे गाड्या सुरू करण्याची आणि कोरोना काळात बंद झालेल्या जुन्या गाड्या पुन्हा सुरू करण्याची मागणी केली. प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी रेल्वेच्या विविध सोयीसुविधांमध्ये सुधारणा करण्याची मागणी निवेदनाद्वारे अश्विनी वैष्णव, केंद्रीय रेल मंत्री, खासदार अमर काळे वर्धा, आमदार समीर कुणावार हिंगनघाट, स्टेशन प्रबंधक हिंगनघाट देण्यात आली आहे.
विशेषतः हिंगणघाट स्थानकावर लिफ्टची सुविधा लवकरच सुरू करण्यासाठी बैठकीत भर देण्यात आला. कोरबा-तिरुअनंतपुरम, इंदौर-तिरुअनंतपुरम, रायपुर-सिकंदराबाद, जोधपुर-चेन्नई सेंट्रल, हिस्सार-सिकंदराबाद, धनबाद-कोल्हापूर, ओखा-पुरी (द्वारका एक्सप्रेस), विशाखापट्टणम-गांधीधाम (एक्सप्रेस), नागपुर – सिकंदराबाद (वंदे भारत एक्सप्रेस) आणि इतर अनेक गाड्यांचे हिंगणघाट येथे थांबे देण्याची मागणी करण्यात आली.
तसेच, भुसावल-वर्धा पैसेंजरला बल्लारशाह पर्यंत विस्तार करणे, अजीन-काजीपेट पॅसेंजर ट्रेनप्रमाणेच नागपूर-बल्लारशाह पॅसेंजर ट्रेन सुरू करण्याची आणि मुंबई व पुण्यासाठी दररोज रेल्वे गाड्या सुरू करण्याची मागणी सदस्यांनी केली. याव्यतिरिक्त, सदस्यांनी सध्या सुरू असलेल्या अमृत भारत स्टेशन योजनेच्या कामाला गती देण्याची विनंती केली, जी संथ गतीने सुरू आहे. भविष्यात हिंगणघाट स्थानकावर प्रवाशांना सुधारित सेवा आणि सुरक्षा उपायांची अपेक्षा आहे.
या बैठकीला हिंगणघाट स्थानकावर स्टेशन सल्लागार समितीचे सदस्य राजेश कोचर, विजय मुथ्था, कौसर अंजुम शेख आणि तुषार हवाईकर यांच्यासह रेल्वे अधिकारी मंगेश तितीरमारे विभागीय वाणिज्य निरीक्षक, बसंतकुमार बल स्टेशन मॅनेजर, आणि प्रकाश मिश्रा आर.पी.एफ. पोलिस निरीक्षक, डी.के. गुरनुले, दिलीप बालपांडे, रवि जुमडे उपस्थित होते. बैठकीत उपस्थित झालेल्या समस्या आणि मागण्या सोडविण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन रेल्वे अधिकाऱ्यांनी सदस्यांना दिले.

