मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- समाजातील ज्येष्ठांची अनुभव समृद्धी आदर्श समाजाच्या निर्मितीस मार्गदर्शक ठरणारी असते, या अनुभव समृद्ध ज्ञानाचा नव पत्रकारांनी उपयोग करून घ्यावा, असे आव्हान हिंगणघाट तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष मंगेश वणीकर यांनी केले. हिंगणघाट तालुका पत्रकार संघाच्या वतीने स्थानिक बेघर निवारा वृद्धाश्रम येथे मराठी पत्रकार दिन उत्साहात वृद्धांसोबत साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार संघाचे अध्यक्ष मंगेश वणीकर होते. कार्यक्रमाला ज्येष्ठ पत्रकार विजय राठी, हिंगणघाट पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष मोहम्मद रफिक, बेघर निवाराचे संचालक दिनेश वर्मा यांची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमाच्या सुरुवातीला आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री. वणीकर यांनी आयुष्यात वृद्धांनी आपल्या कुटुंबासाठी जो त्याग केला त्याचे भान आजच्या तरुण पिढीने ठेवल्यास समाजातून वृद्धाश्रम ही संकल्पनाच हद्दपार होईल, असे मत व्यक्त केले.
यावेळी माजी अध्यक्ष मोहम्मद रफीक यांनी पत्रकारितेचे बदललेले स्वरूप यावर आपले विचार व्यक्त केले. ते म्हणाले पत्रकारांनी निर्भीडतेने समाजाच्या उन्नतीसाठी आपली लेखणी चालवावी, कार्यक्रमात पत्रकार गजानन इंगळे आणि इकबाल पहिलवान यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी बेघर निवारातील ज्येष्ठांचा सत्कार करण्यात आला. तसेच या निवारातील ज्येष्ठ नागरिकांसाठी धान्य पत्रकार संघाच्या वतीने देण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार प्रदीप नागपूरकर यांनी केले, संचालन पत्रकार संघाचे सचिव नरेंद्र हाडके यांनी केले. ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र राठी यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला पत्रकार अनिल कडू, पत्रकार अब्बास खान, रमेश लोंढे, अजय मोहोड, अनिल अवस्थी, दशरथ ढोकपांडे, संजय अग्रवाल, राजेश कोचर, जयचंद कोचर, संजय माडे, चेतन वाघमारे, सचिन वाघे आदींची उपस्थिती होती.