उमेश इंगळे अकोला जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला:- पोलीस हे नागरिकांचे रक्षक असतात पण काही पोलीस हे विसरून नागरिकांना लुटण्यात धन्यता मानतात. त्यामुळे पोलीस प्रशासनावर मोठ्या प्रमाणात प्रश्न चिन्ह निर्माण होते. अशीच खळबळजनक घटना अकोला येथील खदान पोलिस स्टेशनच्या पोलीस अधिकाऱ्यांवर आपल्याच पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल व्हायची वेळ आली.
10 महिन्यांपूर्वी अकोला शहरातील मूर्तिजापूर रोडवरील रामलता बिझनेस सेंटर जवळ असलेल्या हॉटेल महाकालीच्या मालकाला खदान पोलिस स्टेशनचे तत्कालीन पोलिस निरीक्षक धनंजय सायरे Dhananjay Sayare ह्यांनी हॉटेल चालवू देण्यासाठी 50 हजार रुपयांची मागणी केली होती. यावेळी हॉटेल मालकांनी पोलिसांना पैसे देण्यास नकार दिला. त्यानंतर दहा महिन्यांपूर्वी महाकाली हॉटेल मध्ये पोलीसांनी बेकायदा प्रवेश करून हॉटेल मालकाच्या मुलाला जबरदस्तीने पोलिस स्टेशनला घेऊन जाऊन त्याचा मोबाईल हिसकावून घेत जीवनावश्यक वस्तू कायद्यानुसार घरगुती सिलेंडर जप्तीची कारवाई दाखवून त्याच्यावर गुन्हे दाखल केले होते.
पोलिसांनी ही कारवाई 50 हजार रुपये देण्यास नकार दिल्याने खदान पोलिसांच्या या कारवाईला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आवाहन हॉटेल मालकाने दिले व त्यांचा विरोधात दाखल FIR रद्द करण्यासाठी याचिका दाखल करण्यात आली होती. या प्रकरणी ह्यापूर्वी बऱ्याचदा झालेल्या सुनावणीत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय सायरे हे एका गंभीर प्रकरणांत आरोपी असल्याने जवळपास साडे पाच महिने फरार असल्याने स्वतः अथवा वकीलाच्या माध्यमातून आपली बाजू मांडण्यास असमर्थ असल्याने सदरहू प्रकरणाची सुनावणी लांबली होती.
खदान पोलिसांनी जप्त केलेला मोबाईल सुपूर्द नाम्यावर परत मिळण्यासाठी संबंधितांनी न्यायालयातून आदेश देखील आणला होता. तरीही ह्या अधिकाऱ्यांनी तो देण्यास टाळाटाळ केल्याने त्याबाबतही हायकोर्टाला अवगत करण्यात आले होते. तसेच पोलिसांनी अधिकार क्षेत्राबाहेर जावून वैयक्तिक फायद्यासाठी ही कारवाई केल्याचा आरोप करण्यात आल्याने नागपूर उच्च न्यायालयाने जिल्हा पोलीस अधीक्षकांना देखील याप्रकरणी शपथपत्र सादर करण्यास सांगितले होते. या दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने तब्बल 10 महिन्यांनी अकोला जिल्हाधिकारी यांनी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांसमोर हजर होवून खुलासा सादर करण्याबाबत दिनांक 3 जानेवारी 2025 रोजी पोलीस मार्फत नोटीस दिली होती.
नागपूर उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नितीन सांबरे व वृषाली जोशी यांच्या खंडपीठाने या प्रकरणातील सरकारी पक्ष व फिर्यादीच्या वकिलांनी केलेला युक्तिवाद लक्षात घेत अकोल्यातील खदान पोलिस स्टेशनचे तत्कालीन पोलीस निरीक्षक धनंजय महादेव सायरे Dhananjay Sayare व सहाय्यक पोलिस निरीक्षक निलेश करंदीकर API Nilesh Karandikar यांच्यावर फिर्यादीवर अत्यंत बेजबाबदारपणे गुन्हे दाखल केल्या बद्दल दिनांक 6 जानेवारी 2025 रोजी अंतरिम आदेश पारित करीत जिल्हा पोलिस अधीक्षक बच्चनसिंग यांना या दोन्ही अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी केलेल्या कारवाईचा अहवाल हायकोर्टाला प्राप्त झाल्यावर या प्रकरणांत पुढील कारवाईसाठी दिनांक 20 जानेवारी 2025 रोजी सुनावणीची तारीख निश्चित करण्यात आली आहे. त्याच दिवशी ह्या प्रकरणाचा अंतिम आदेश पारित होण्याची शक्यता आहे.