संतोष मेश्राम, राजुरा तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा 15:- चंद्रपूर जिल्ह्यातील भवानजीबाई विद्यालय चंद्रपूर येथे 52 व्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन दिनांक 12 जानेवारी ते 14 जानेवारी 2025 दरम्यान करण्यात आले होते. यात जिल्ह्यातील विध्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग होता. समाजाला उपयोगी विज्ञान व तंत्रज्ञान या संकल्पनेतून अनेक प्रतिकृती ठेवण्यात आल्या होत्या. त्यात राजुरा तालुक्यातील मौजा हरदोना (खुर्द ) जिल्हा परिषद शाळेतील इय्यता सातवी ची विद्यार्थिनी कु. भारवी किशोर शास्त्रकार या विद्यार्थिनीने “निरोपयोगी कापडापासून कागद तयार करणे ” या विषयावर टाकाऊ वस्तू पासून समाज उपयोगी टिकाऊ वस्तू कशी बनवावी, यावर आधारित प्रतिकृती ही मुख्य मार्गदर्शक शिक्षिका तृप्ती वाघे – टिकले यांच्या मार्गदर्शनात तयार करून प्रदर्शनीत ठेवली होती. तिच्या प्रतिकृतीला आदिवासी उच्च प्राथमिक गटातून जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक देण्यात आला.
यापूर्वीही भारवी शास्त्रकार हिने नवरत्न स्पर्धेत “एकपात्री भूमिका अभिनय” स्पर्धेत तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकावून शाळेचे व गावाचे नाव उंचावले आहे. आता पुन्हा एकदा जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनीत प्रथम क्रमांक पटकावून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन व संधी मिळाली तर ते सुद्धा कोणत्याही क्षेत्रात मागे नसतात हे सिद्ध केले आहे. तिची ही प्रतिकृती आता राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनी सहभाग होणार असून तिच्या या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक जाधव, शिक्षक मंडोगडे शाळा व्यवस्थापन समिती, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, पालक, गावकरी तसेच विविध मान्यवराकडून अभिनंदन करण्यात येत आहे.

