आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी जाणून घेतल्या परिसरातील प्रत्येक गावच्या समस्या. पाण्याच्या समस्या प्राधान्याने सोडविणार.
अनिल अडकिने नागपूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर:- २४ जानेवारी रोजी पंचायत समिती सावनेर येथे पाणी टंचाई आढावा बैठक पार पडली. आढावा बैठकीला शासनाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते. सर्वप्रथम आमदार डॉ. आशिष देशमुख यांच्या समक्ष प्रत्येक गावाच्या सरपंचांनी आपआपल्या गावातील विविध प्रकारच्या पाणी समस्या मांडल्या. इतर समस्यांवर सुध्दा चर्चा करण्यात आली. सर्व समस्यांवर सकारात्मक चर्चा करून आमदार डॉ देशमुख यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देत त्या समस्या ताबडतोब सोडविण्या संबंधी सूचना दिल्या. दूषित पाण्याचा पुरवठा होत असेल तर त्यावर नियंत्रण आवश्यक आहे, जेणेकरून सर्वांचे आरोग्य चांगले राहील.
याप्रसंगी आमदार डॉ. देशमुख म्हणाले, “सावनेर-कळमेश्वर विधानसभा क्षेत्रात कोणालाही पाण्यासाठी भटकंती करण्याची गरज पडू नये, यासाठी कठोर उपाययोजना राबविण्यात येतील. सर्वांना स्वच्छ पाणी सुलभरित्या मिळावे, यासाठी माझे प्रयत्न असून पाण्याची समस्या प्राधान्याने सोडविण्यात येईल. सावनेर-कळमेश्वर क्षेत्र हे विकसित करून राज्यातील पहिल्या नंबरचे करायचे आहे. ग्रामीण भागातील समस्या मार्गी लावण्यासाठी चांगल्या योजना अमलात आणू. सर्वांगीण विकासासाठी समाधानकारक पावले उचलण्यात येतील.
यावेळी माजी मंत्री रणजीत देशमुख, डॉ.राजीव पोतदार, मनोहर कुंभारे, विजय देशमुख, ऍड. शैलेश जैन, ऍड. अरविंद लोधी, मंदार मंगळे, प्रमोद ढोले, तुषार उमाटे आदी मान्यवर उपस्थित होते.