प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा दि.२५:- वर्धा जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा राज्याचे गृह, गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार व खनिकर्म राज्यमंत्री तथा वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी आढावा घेतला. यावेळी आमदार समीर कुणावार, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, जिल्हाधिकारी श्रीमती वान्मथी सी., जिल्हा पोलीस अधीक्षक अनुराग जैन, अप्पर पोलीस अधीक्षक सागर कवडे व पोलीस अधिकारी उपस्थित होते.
गुन्हेगारीचा आलेख कमी होऊन वर्धा जिल्हा आदर्श जिल्हा म्हणून पुढे यावा तसेच पोलीस विभागाने कायदा व सुव्यवस्था चोख ठेवावी अशा सूचना पालकमंत्र्यांनी केल्या. यावेळी पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांनी सदारीकरणाद्वारे सविस्तर माहिती दिली.
मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी गुन्हेगारीचा आलेख कमी झाल्याचे त्यांनी नमूद केले. गुन्हे दोष सिद्धीचे प्रमाणात वीस टक्के वाढ झाल्याचे सांगितले. सायबर सुरक्षा अभियान, नागरिकांचे हरविलेले मोबाईल फोन परत करणे, संवेदनशील ठिकाणी पोलीस अधिकाऱ्यांच्या वारंवार भेटी व मोहल्ला समिती गठीत करणे, विविध चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे असे नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले असल्याचे श्री. जैन यांनी सांगितले.
वर्धा येथे सुसज्ज रासायनिक प्रयोगशाळा निर्मिती करणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले. पोलीस विभागाचे सक्षमीकरण करण्यासाठी त्यांनी यावेळी काही मागण्या पालकमंत्री यांच्या समोर ठेवल्या. रामनगर पोलीस स्टेशन बांधकामासाठी जागा हस्तांतरण, सेलू पोलीस स्टेशन जागा पोलीस विभागाच्या नावे करणे, आर्वी येथे पोलीस विभागाची नवीन प्रशासकीय इमारत, हिंगणघाट ग्रामीण पोलीस स्टेशन निर्माण करणे, पिंपरी मेघे पोलीस वसाहत पुनर्विकास, पोलीस कल्याण निधी अंतर्गत पेट्रोल पंप उभारणी, पोलीस अधीक्षक कार्यालय इमारत लगत वाढीव बांधकाम व रिक्त पदे भरणे आदी मागण्यांचा यात समावेश आहे. पोलीस विभागाने मागण्यांचे प्रस्ताव सादर करावे असे पालकमंत्री म्हणाले.
आर्वी व पुलगाव येथे सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्या बाबतीतही या बैठकीत चर्चा करण्यात आली. वर्धा व हिंगणघाट येथील सीसीटीव्ही यंत्रणेच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले असून टप्पा दोनचे कामही लवकर हाती घेण्यात यावे असे आमदार समीर कुणावर म्हणाले.
पालकमंत्री यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करून भ्रष्टाचारमुक्त पोलीस प्रशासनाला प्राधान्य देण्यात येणार असल्याचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी सांगितले.