विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी.
मो. नं.9421856931.
आदिवासी विद्यार्थ्यांना इतर मुलांसारखेच इंग्रजी माध्यमातून शिक्षण मिळावे, त्यांनी स्पर्धेच्या युगात टिकून रहावे याकरीता केंद्रसरकार कडून नवोदयच्या धर्तीवर सी. बी.एस.ई. माध्यमातून शिक्षण देण्यासाठी देशभरातील विविध ठिकाणी एकलव्य मॉडेल रेसिडेन्शिअल स्कूलची स्थापना करण्यात आलेली आहे. ए.आ.वि.प्र.भामरागड अंतर्गत येणाऱ्या एटापल्ली तालुक्यातील तुमरगुडा येथे दि. १४ एप्रिलला सदर शाळेच्या इमारती व इतर सुविधांकरीताचा भूमीपूजन कार्यक्रम मा. श्री. नमन गोयल ( भा.प्र. से.) प्रकल्प अधिकारी तथा सहा. जिल्हाधिकारी यांचे हस्ते पार पडला.
सदर शाळेच्या एकूण १० एकर परिसरामध्ये शाळा इमारत, मुलांचे व मुलींचे वस्तीग्रुह, खेळाचे मैदान, हॉल, मेस, कर्मचारी निवासस्थान इत्यादींचा समावेश असून ती पुढील १८ महीन्यात पूर्णत्वास येईल. ६ वी ते १२ वी पर्यंत असणाऱ्या या शाळेची एकूण विद्यार्थी क्षमता ४८० इतकी असणार. सदर शाळेचे विद्यार्थी हे सद्यस्थितीत शासकीय आश्रमशाळा कसनसूर येथे शिक्षण घेत आहेत. सदर शाळेमध्ये परिक्षेच्या माध्यमातून प्रवेश मिळत असल्याने येथे नागपूर विभागातील विविध जिल्ह्याचे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तालुक्यापासून केवळ २ किमी असल्याने पालकांना त्यांच्या पाल्यांना भेटणे सुद्धा सोयीचे होणार आहे. सदर भूमीपूजनाला तुमरगुडा ग्रामपंचायतचे सरपंच श्रीमती सविता गावडे, उपसरपंच श्री. माधव गावडे, स.प्र.अ. शिक्षण श्री. माधव मडावी, पोलीस पाटील श्री. केशव गावडे, समर्थ कंस्ट्रक्शनचे सर्व कर्मचारी, एकलव्य शाळेचे प्राचार्य तथा शिक्षकवृंद, तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
सदर शाळा ही उत्तमरित्या जलद गतीने बांधून घेण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न राहील. विद्यार्थ्यांना येथील सोईसुविधांचा लवकरात लवकर लाभ उपलब्ध करुन देण्यासाठी आपण कटीबद्ध असून काम तातडीने पूर्णत्वास नेण्यास जातीने लक्ष देऊ:- श्री. नमन गोयल

