✒️श्याम भूतडा बीड जिल्हा प्रतिनिधी
बीड: जिल्हात सध्या कोरोना जवळपास हद्दपारच झाला आहे. गेले काही दिवस एकही रुग्ण सापडलेला नाही. यामुळे आरोग्य विभागावरील ताण कमी झाला असला तरी बिड जिल्हातील अनेक तालुक्यातील आणि अंबाजोगाई येथील रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय आरोग्य यंत्रणा कोमात गेल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे गरीब रुग्णांना मोठ्या प्रमाणात हाल होत आहे.
अंबाजोगाई येथील रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय येथे मोठ्या प्रमाणात भगवान भारोसे कारभार सुरू आहे. रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय रेडीओलॉजीत एकही तज्ज्ञ नाही. स्वारातीच्या सर्वच विभागांत तज्ज्ञांची पदे रिक्त. स्वारातीचे एमआरआय वीज पुरवठ्या अभावी धुळखात. शासकीय रुग्णालयामध्ये अतिरिक्त शल्यचिकीत्सक, निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांसह २५ वर्ग एक अधिकाऱ्यांची पदे रिक्त. शासकीय रूग्णालयात एमआरआय उपकरण नाही. कॅथलॅब, निसर्गोपचार केंद्र मंजूर पण चार वर्षांपासून कार्यान्वित नाही. लोखंडीला मानसोपचार रुग्णालय पण तज्ज्ञच नाही. लोखंडीचे वृद्धत्व आजार, स्त्री रुग्णायलयांत शिपाई/सफाईगारांची भरतीच नाही. वडवणी, शिरुर कासार, चौसाळा, उमापूर ग्रामीण रुग्णालयेही रखडली.
गतवर्षी वैद्यकिय अधिकार्यांच्या रिक्त पदांमुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर गेली होती. मात्र, त्याला पर्याय म्हणून कंत्राटी तत्त्वावर चांगले मानधन देऊन एमबीबीएस वैद्यकीय अधिकार्यांची जिल्हास्तरावर भरती करण्याचा निर्णय झाला. शासनाने 40 हजार रुपये मानधनावर तदर्थ म्हणून नियुक्त करण्याचे अधिकारी जिल्हास्तरावर आरोग्य विभागाला दिले. जिल्हा परिषदेची अनेक प्राथमिक आरोग्य केंद्र असून प्रत्येक आरोग्य केंद्रात दोन वैद्यकीय अधिकारी पदे मंजूर होती. ती सर्वच्या सर्व भरलेली आहेत. परंतु, वर्ग 3 ची आणि वर्ग 4 संवर्गातील रिक्त पदे रिक्त असून ही संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या काही वर्षात नव्याने भरती न झाल्यामुळे सेवानिवृत्त वाढत आहेत.
आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सेवक, परिचर हे कर्मचारी प्रत्यक्ष रुग्णाची देखभाल करण्यासाठी नियुक्त केले गेले आहेत. वैद्यकीय अधिकारी उपचार करत असतात, तर रुग्णांना अन्य सेवा देण्याची जबाबदारी कर्मचार्यांवर असते. पायाच डळमळायला लागल्याने आरोग्य सेवा देताना तारेवरची कसरत करावी लागते. सगळ्याच आरोग्य केंद्रात ही परिस्थिती आहे. दुर्गम गावांमध्ये याचा सर्वाधिक फटका बसतोय. सेवानिवृत्तीने पद रिक्त झाल्यावर तेथे नियुक्ती कशी द्यायची असा प्रश्न तालुका आणि जिल्हास्तरावरील अधिकार्यांना पडतो. तदर्थ वैद्यकीय अधिकार्यांप्रमाणे तात्पुरती नियुक्तीसंदर्भात निर्णय घेतला तर यामधून सावरणे शक्य आहे. त्याचे अधिकार जिल्हास्तरावर दिल्यास उपयुक्त ठरेल, अन्यथा बिकट परिस्थितीला सामोरे जावे लागेल असे चित्र जिल्ह्यात असल्याचे दिसून येत आहे.