संतोष मेश्राम चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- इन्फंट जीजस सोसायटी द्वारा संचालित इन्फंट जीजस इंग्लिश पब्लिक हायस्कूल येथील विद्यार्थ्यांनी दि. १० सप्टेंबर २०२५ रोजी राजुरा येथील ॲक्सिस बँकेला शैक्षणिक क्षेत्रभेट दिली. या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना बँकिंगची कार्यपद्धती, वित्तीय व्यवहारांचे तंत्र आणि बचतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजणे हा होता.
या भेटीदरम्यान ॲक्सिस बँकेच्या शाखा व्यवस्थापक श्रुती कुर्हेकर यांनी विद्यार्थ्यांना बँकेतील विविध व्यवहार, खाते उघडण्याची प्रक्रिया, डिजिटल बँकिंग, एटीएम सेवा आदींबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी “लहानपणापासून बचतीची सवय लावली तर भविष्यात आर्थिक सुरक्षितता नक्कीच लाभते” असे सांगत बचतीचे महत्त्व अधोरेखित केले.
या शैक्षणिक क्षेत्रभेटीत सीबीएसई अभ्यासक्रमाच्या इयत्ता ८ वीतील सर्व विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवला. शाळेच्या मुख्याध्यापिका मंजुषा अलोने यांच्या मार्गदर्शना खाली ही भेट आयोजित करण्यात आली होती. यावेळी वर्गशिक्षिका वैशाली धानोरकर तसेच सहाय्यक शिक्षक उमेश महाकुलकर विद्यार्थ्यांसोबत उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष व्यवहाराची प्रक्रिया जवळून पाहून बँकिंग क्षेत्रातील ज्ञान आत्मसात केले. या उपक्रमामुळे त्यांच्या वित्तीय साक्षरतेत भर पडली असून अशा प्रकारच्या शैक्षणिक क्षेत्रभेटी विद्यार्थ्यांच्या दृष्टीकोनाचा विस्तार करणाऱ्या ठरत असल्याचे मत शिक्षकांनी व्यक्त केले.

