मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.
अहेरी:- नगरपंचायत अंतर्गत घरकुल धारकांना रेती उपलब्ध करून देण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते तथा नगरसेवक अमोल मुक्कावार यांच्या पुढाकारातून नगरपंचायतीचे मुख्याधिकारी गणेश शहाणे यांना दिनांक 27 जानेवारी 2026 रोजी निवेदन देऊन मागणी केली आहे.
मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, नगर पंचायत क्षेत्र अहेरी येथे प्रधानमंत्री आवास योजना व रमाई घरकुल योजनेअंतर्गत अंदाजे 300 घरकुल मंजुर झालेले आहे. सदर बांधकामांपैकी रमाई घरकुल योजनेचे कार्यारंभ आदेश वितरित झालेले आहेत. माहे जुन महिण्यात पावसाळ्याअभावी लाभार्थ्यांना रेती उपलब्ध होऊ शकली नाही.
सद्यस्थितीत घरकुलाची कामे सुरु करता येऊ शकतात. करीता शासन निर्णयाप्रमाणे घरकुल धारकांना रेती उपलब्ध करुन देण्यात यावे असे निवेदन देऊन मागणी करण्यात आली आहे.
यावेळी नगरपंचायत अहेरीचे मुख्याधिकारी गणेश शहाणे यांना निवेदन देताना नगरसेवक अमोल मुक्कावार, सामाजिक कार्यकर्ते अमोल रामटेके, ग्रामस्थ विजय बोरकुटे, अरुण रामटेके, नागेश्वर रामटेके, संतोष सुनतकर इ. नागरिक उपस्थित होते.

