✒️मंगेश जगताप, मुंबई प्रतिनिधी
मुंबईः दीड महिन्यापूर्वी आयोजित करण्यात आलेल्या दहीहंडी उत्सवात दही हंडी फोडताना थर लावताना पडलेल्या गोविंदा प्रथमेश सावंतचा अखेर मृत्यू झालाय. तब्बल दीड महिने प्रथमेशने मृत्यूशी झुंज दिली. अखेर त्याची झुंज अपयशी ठरली. दही हंडीत थर लावताना पाचव्या थरावरून प्रथमेश सावंत हा तरुण पडला होता त्यामुळे पाठीच्या मणक्याला गंभीर दुखापत झाली होती. तेव्हापासून तो अंथरुणाला खिळून होता. करी रोड येथील साईभक्त क्रीडा मंडळातर्फे त्याने दहीहंडी उत्सवात भाग घेतला होता.
आज केईएम रुग्णालयात प्रथमेश सावंत याने अखेरच्या श्वास घेतला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रथमेश सावंतच्या नातेवाईकांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रथमेश सावंतवर केईएम रुग्णालयात उपचार सुरु होते. अनेक राजकीय नेत्यांकडूनही त्याच्या प्रकृतीची चौकशी सुरु होती. वेळोवेळी आर्थिक मदतही करण्यात येत होती.
यावर्षी दहीहंडी उत्सवात मृत्यूमुखी पडलेला प्रथमेश हा दुसरा गोविंदा आहे. यापूर्वी 24 वर्षीय संदेश साळवी या गोविंदाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. तर आज 20 वर्षीय प्रथमेश सावंतने अखेरचा श्वास घेतल्याची बातमी धडकली आहे.
प्रथमेश सावंतची कथा कुणालाही हेलावून टाकणारी. 20 वर्षीय प्रथमेश सावंत पेपर टाकून रोजीरोटी कमावत होता. आई लहानपणीच कँसरने गेली. ऐन उमेदीच्या काळात वडिलांचाही मृत्यू झाला. प्रथमेशची एक बहीण काकीसोबत राहते तर प्रथमेश पेपर टाकणे, पिझ्झा डिलिव्हरी करण्याचे काम करायचा.
दहीहंडीदरम्यान, तो कोसळल्यानंतर प्रथमेशच्या पाठीचा कणा मोडला. तेव्हापासून तो बेडवरच होता. हातांच्या बोटांची हालचाल नव्हती. प्रथमेशला मसल्स पॅरेलेसिस झाला होता. त्याच्यावर मोफत उपचार करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. आज अखेर केईएम रुग्णालयात प्रथमेशचा मृत्यू झाला.

