डॉ. लुबना हकीम यांच्या कार्याची मान्यवरांकडून विशेष प्रशंसा.
मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे साहेब(DHO) तसेच अहेरी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. किरण वानखेडे (THO) यांनी काल महागाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास सविस्तर भेट दिली. या भेटीचा उद्देश ग्रामीण भागातील आरोग्य सेवा, सुविधा आणि विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेणे हा होता.
भेटीदरम्यान मान्यवरांनी रुग्ण नोंदवही, औषध साठा, लसीकरण कार्यक्रम, माता व बाल संगोपन सेवा, कुटुंब नियोजन उपक्रम, संसर्गजन्य व असंसर्गजन्य आजारांचे निदान व उपचार यांसह विविध विभागांची तपासणी केली. तसेच प्रयोगशाळा सेवा, आपत्कालीन सुविधा, स्वच्छता व्यवस्था, औषध वितरण पद्धती आणि रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सेवा यांचीही सखोल पाहणी करण्यात आली.
यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. लुबना हकीम यांनी पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांचे स्वागत केले. त्यानंतर त्यांनी केंद्रातील दैनंदिन कामकाज, उपलब्ध मनुष्यबळ, राबविण्यात येणारे आरोग्य उपक्रम, तसेच ग्रामीण नागरिकांसाठी राबविण्यात येणाऱ्या विशेष मोहिमांबाबत सविस्तर माहिती दिली. त्यांनी आरोग्य केंद्रासमोरील अडचणी आणि त्यावर करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचीही माहिती मांडली.
भेटीदरम्यान डॉ. शिंदे व डॉ. किरण वानखेडे यांनी केंद्रातील एकूणच कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले. विशेषतः ग्रामीण व दुर्गम भागात अत्यंत मर्यादित साधनसामग्रीमध्येही दर्जेदार व वेळेवर आरोग्य सेवा उपलब्ध करून देत असल्याबद्दल त्यांनी डॉ. लुबना हकीम यांच्या कार्याचे भरभरून कौतुक केले. त्यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य केंद्रात शिस्तबद्ध, पारदर्शक आणि परिणामकारक कामकाज सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.
तसेच रुग्णांशी नम्र व संवेदनशील वर्तन, वेळेवर उपचार, लसीकरण मोहिमेतील सक्रिय सहभाग आणि शासकीय आरोग्य योजनांची प्रभावी अंमलबजावणी याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. भविष्यातही अशाच प्रकारे सेवा देत राहण्याचे आवाहन मान्यवरांनी केले.
ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकापर्यंत दर्जेदार व परवडणारी आरोग्य सेवा पोहोचविण्यासाठी आरोग्य प्रशासन कटिबद्ध असून, आवश्यक त्या सर्व सुविधा व सहकार्य देण्यात येईल, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.
या भेटीमुळे आरोग्य कर्मचाऱ्यांचा उत्साह द्विगुणित झाला असून, ग्रामीण आरोग्य सेवेला अधिक बळकटी मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

