कोणीही वनाला आग पेटवू नये
असे वनपरीक्षेत्र अधिकारी विलास कोसनकर यांनी पत्रकातून केली आहे.
मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.
उन्हाळ्याची सुरुवात होताच अहेरी तालुक्यातील रेपणपल्ली वन विभागाच्या क्षेत्रात जंगल परिसरात आग लागण्याच्या घटना वाढू लागल्या आहेत. जंगलातील सुकलेल्या पानांना आणि गवताला आग लागल्यामुळे मोठ्या प्रमाणावर वनसंपत्तीचे नुकसान होत आहे. विशेष म्हणजे या आगीमुळे जंगलातील दुर्मिळ व मौल्यवान आयुर्वेदिक वनस्पती देखील नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
दरवर्षी उन्हाळ्याच्या सुरुवातीला जंगलात साचलेल्या सुक्या पानांमुळे आणि मानवी निष्काळजीपणामुळे आग लागण्याच्या घटना घडतात. अनेकदा काही असामाजिक तत्वांकडून जाणीवपूर्वक आग लावली जात असल्याचाही संशय व्यक्त केला जात आहे. यामुळे जंगलातील लहान रोपे, वन्यजीवांचे अधिवास आणि पर्यावरणाला मोठा फटका बसत आहे.
वनविभागाकडून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू असले तरी अनेक ठिकाणी दुर्गम भाग असल्यामुळे आग विझविण्यात अडचणी येत आहेत. स्थानिक ग्रामस्थांनी देखील वनविभागाला सहकार्य करून जंगलातील आगीवर नियंत्रण मिळविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांना जंगलात आग लावू नये तसेच कुठेही आग लागलेली दिसल्यास तात्काळ प्रशासनाला कळविण्याचे आवाहन केले आहे. जंगल आणि पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी सर्वांनी जागरूक राहणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.वनपरिक्षेत्रातील प्रत्येक गावात, ग्रामसभा घेऊन आणि कलापथकद्वारे नाट्यमय प्रात्यक्षिक करून आगीमुळे वनाचे, वन्यप्राण्यांचे नुकसान होऊन पर्यावरण संतुलन कसे बिघडते, त्याचे दुष्परिणाम मानवास भोगावे लागतात यावर जनजागृती करण्यात आलेले असून वनक्षेत्रात आग लागणार नाही म्हणून यंत्रणा कार्यान्वित आहे. आग लावनाऱ्याचे नाव व पत्ता सांगणाऱ्या व्यक्तीस रक्कम पाच हजार रुपये बक्षीस देण्यात येत असून खबरीचे नांव गुपित ठेवण्यात येईल, असे विभागामार्फत गावागावात प्रचार व प्रसार करण्यात आला आहे.
वनक्षेत्रात लागलेली आग वेळीच निदर्शनास येऊन तात्काळ विझविण्यात आली पाहिजे म्हणून वनक्षेत्रात क्रू स्टेशन उभारून त्यावर दिवस-रात्र अग्निरक्षक व वनरक्षक गस्त करीत आहेत.असेही पत्रकातून वनपरीक्षेत्र अधिकारी विलास कोसनकर यांनी केली आहे.
