मधुकर गोंगले, उपसंपादक
मो. नं. 9420751809.
समंधित कंत्राटदराचे नोंदणी रजिस्टेशन रद्द करा जनतेची मागणी
अहेरी : तालुक्यातील सिरोंचा मार्गांवर असलेल्या झिम्मेला गावापर्यंतचा रस्ता मागील चार वर्षांपूर्वी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत (PMGSY) मंजूर करण्यात आला होता. या रस्त्याच्या कामासाठी टेंडर प्रक्रियाही पूर्ण झाली होती. मात्र संबंधित कंत्राटदाराने काम पूर्ण न केल्याने आजही हा रस्ता अपूर्ण अवस्थेत असून नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
सदर रस्त्यावर अनेक ठिकाणी खडी पसरलेली असून डांबरीकरण अपूर्ण आहे. त्यामुळे दुचाकीस्वारांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. विशेषतः पावसाळ्यात परिस्थिती आणखी बिकट होत असून चिखल व घसरड्या रस्त्यामुळे अनेक लहान-मोठे अपघात घडल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे.
झिम्मेला गावातील रहिवाशांनी सांगितले की, “रस्ता मंजूर होऊनही काम पूर्ण झाले नाही. रोजच्या प्रवासात जीव धोक्यात घालावा लागतो. अनेक वेळा दुचाकी घसरून अपघात झाले आहेत.” या परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाणे, तसेच नागरिकांना बाजारपेठ व आरोग्य सेवांसाठी जाणे कठीण झाले आहे.
दरम्यान, या प्रकरणाची दखल घेत संबंधित कंत्राटदाराविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. समाजमाध्यमांवरून नागरिकांनी संताप व्यक्त करत कंत्राटदाराचे नोंदणी (रजिस्ट्रेशन) तात्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे.
तसेच प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित कंत्राटदारावर कडक कारवाई करावी, तसेच अपूर्ण रस्ता तातडीने पूर्ण करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी जोरदार मागणी परिसरातून होत आहे.
सध्या प्रशासन या मागणीवर काय भूमिका घेते, आणि रखडलेला रस्ता कधी पूर्ण होतो, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे
