शिक्षक उपसंचालक कडून वन वैभव मंडळाचे कौतुक.
मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.
भामरागड : वन वैभव शिक्षण मंडळ संचालित भगवंतराव प्राथमिक व जय पेरसापेन माध्यमिक आश्रमशाळा, भामरागड येथे दिनांक १२ एप्रिल रोजी शिक्षण क्षेत्रातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आकस्मिक भेट देऊन शाळेच्या शैक्षणिक व प्रशासकीय कार्याचा सखोल आढावा घेतला. या भेटीमुळे शाळेतील शैक्षणिक वातावरणाला नवी ऊर्जा मिळाली.
या भेटीदरम्यान मा. डॉ. सौ. माधुरी सावरकर मॅडम (शिक्षण उपसंचालक, नागपूर विभाग) आणि मा. सौ. निलीमा टाके मॅडम (शिक्षण उपसंचालक, अमरावती विभाग) यांनी शाळेतील शैक्षणिक उपक्रम, अध्यापन पद्धती, विद्यार्थ्यांची उपस्थिती, गुणवत्ता तसेच एकूण शैक्षणिक प्रगती यांचे बारकाईने निरीक्षण केले. त्यांच्या समवेत डॉ. इंगोले सर (प्राचार्य, शासकीय शिक्षण महाविद्यालय, भंडारा) तसेच मा. श्री. गुल्हाने साहेब (वेतन अधीक्षक, अमरावती) हेही उपस्थित होते.
शाळेत आगमन होताच वन वैभव शिक्षण मंडळाच्या वतीने सर्व मान्यवरांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. यावेळी पुष्पगुच्छ अर्पण करून तसेच आदिवासी नृत्य सादर करून मान्यवरांचे उत्स्फूर्त व सांस्कृतिक स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या या सादरीकरणामुळे संपूर्ण परिसरात आनंदाचे व उत्साही वातावरण निर्माण झाले.
त्यानंतर मान्यवरांनी शाळेतील विविध विभागांची सविस्तर पाहणी केली. वर्गखोल्यांना भेट देऊन त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला व त्यांच्या शैक्षणिक प्रगतीबाबत माहिती घेतली. शिक्षकांकडून अध्यापन पद्धती, शैक्षणिक नियोजन, विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी राबविण्यात येणारे उपक्रम याबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली.
यानंतर प्रयोगशाळा, वाचनालय, वसतिगृह, स्वच्छता व्यवस्था तसेच इतर शैक्षणिक व भौतिक सुविधांचीही पाहणी करण्यात आली. विद्यार्थ्यांची शिस्त, उपस्थिती आणि शाळेतील एकूण शैक्षणिक वातावरण याबाबत मान्यवरांनी समाधान व्यक्त केले. तसेच शाळेतील शिक्षकांच्या कार्यतत्परतेचे कौतुक करून विद्यार्थ्यांच्या प्रगतीबद्दल आनंद व्यक्त केला.
कार्यक्रमाला मा. प्रा. सरफराज आलम सर , मा. प्राचार्य शाहीद शेख सर (प्राचार्य), मा. प्राचार्य गजानन लोनबले सर, मा. श्री. मडावी सर (केंद्र प्रमुख), मा. श्री. रामटेके सर श्री बांबोडे सर केंद्र प्रमुख (केंद्र प्रमुख) तसेच मा. मुख्याध्यापक प्रनब मंडल सर उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी पाहुण्यांचे स्वागत करून कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
भेटीच्या शेवटी अधिकाऱ्यांनी शाळेच्या कार्याचे मनापासून कौतुक केले आणि पुढील वाटचालीसाठी आवश्यक मार्गदर्शन केले. तसेच काही सुधारणा सूचित करून शैक्षणिक गुणवत्ता अधिक वृद्धिंगत करण्यासाठी सकारात्मक दिशा दिली. ही आकस्मिक भेट शाळेसाठी प्रेरणादायी ठरली असून, भविष्यातील प्रगतीसाठी उपयुक्त ठरेल असे मत व्यक्त करण्यात आले.

