व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन यांची प्रेरणादायी उपस्थिती.
विश्वनाथ जांभूळकर
मो. नं. 9421856931
सामाजिक उत्तरदायित्वाचे भान जपत लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड च्या सीएसआर शाखा, लॉयड्स इन्फिनिट फाउंडेशन तर्फे कोंसारी आणि सुरजागड येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे ७७७ युनिट रक्ताचे संकलन झाले असून, गेल्या वर्षीच्या ५०१ दात्यांच्या विक्रमाला मागे टाकत या उपक्रमाने नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे.
या शिबिराचे मुख्य आकर्षण म्हणजे लॉयड्स मेटल्सचे व्यवस्थापकीय संचालक श्री. बी. प्रभाकरन यांनी स्वतः प्रथम रक्तदान करून कर्मचाऱ्यांसमोर एक नवा आदर्श ठेवला. त्यांच्या या कृतीने उपस्थितांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाला.
“रक्तदान ही मानवतेची सर्वात मोठी सेवा आहे. एक छोट्याशा कृतीतून आपण कोणाचे तरी प्राण वाचवू शकतो. अशा उपक्रमांमुळे समाजातील नातेसंबंध अधिक घट्ट होतात,” असे प्रतिपादन श्री. प्रभाकरन यांनी यावेळी केले.
कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
शिबिरात कंपनीच्या सर्व स्तरांतील कर्मचाऱ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. केवळ एक औद्योगिक संस्था म्हणून काम न करता, समाजाच्या आरोग्यासाठी योगदान देण्याची कंपनीची संस्कृती या निमित्ताने दिसून आली. कर्मचाऱ्यांच्या या सकारात्मक दृष्टिकोनामुळेच हे शिबिर यशस्वी झाले.
सामाजिक बांधिलकीचा वारसा
लॉयड्स मेटल्स ही संस्था केवळ औद्योगिक क्षेत्रातच नव्हे, तर आरोग्य आणि सामुदायिक कल्याणाच्या कामातही नेहमीच अग्रेसर राहिली आहे. भविष्यातही अशाच प्रकारचे मानवतावादी उपक्रम राबवून आरोग्य क्षेत्रातील गरजा पूर्ण करण्यासाठी कंपनी कटिबद्ध असल्याचे व्यवस्थापनाने स्पष्ट केले.

