मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.
अहेरी : तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या कम्मासुरु गावाच्या मूलभूत सुविधांकडे पुन्हा एकदा लक्ष वेधले गेले आहे. गावापर्यंत जाणाऱ्या डांबर रस्त्याची तसेच गावातील सिमेंट रस्त्याची आणि नाल्यावर मोठ्या पुलाच्या बांधकामाची मागणी करत नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निवेदन सादर केले आहे.
सदर निवेदन सार्वजनिक बांधकाम विभाग गडचिरोली येथील अधीक्षक अभियंत्यांना देण्यात आले असून, माध्यमातून कार्यकारी अभियंता, आलापल्ली यांच्याकडेही पाठविण्यात आले आहे. या निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, कम्मासुरु हे गाव अत्यंत दुर्गम भागात असून, गावापर्यंत पोहोचण्यासाठी योग्य रस्त्याची सुविधा उपलब्ध नाही. सध्या असलेला कच्चा रस्ता पावसाळ्यात पूर्णतः खराब होतो, त्यामुळे गावकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो.
गावात सिमेंट रस्त्याचा अभाव असल्यामुळे नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होत आहे. विशेषतः विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यास अडथळे निर्माण होतात, तर रुग्णांना दवाखान्यात नेण्यासाठीही मोठा त्रास सहन करावा लागतो. पावसाळ्यात परिस्थिती अधिकच बिकट होत असल्याचे ग्रामस्थांनी नमूद केले आहे.
याशिवाय, गावाजवळील नाल्यावर पूल नसल्यामुळे वाहतुकीत अडथळे निर्माण होतात. त्यामुळे तातडीने मोठ्या पुलाचे बांधकाम मंजूर करून काम सुरू करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
निवेदनावर जावेद अली यांची स्वाक्षरी असून, या मागणीची गंभीर दखल घेऊन प्रशासनाने लवकरात लवकर आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. तसेच या निवेदनाची प्रत राजे अंबरीशराव आत्राम माजी राज्यमंत्री तथा पालकमंत्री यांनाही देण्यात आली आहे.
गावकऱ्यांच्या या मागणीकडे प्रशासन कितपत गांभीर्याने पाहते आणि प्रत्यक्षात कामाला गती मिळते का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
