मधुकर गोंगले उपसंपादक.
मो. नं. 9420751809.
सिरोंचा तालुक्यातील पिण्याच्या पाण्याच्या गंभीर समस्येच्या पार्श्वभूमीवर बंद अवस्थेतील हातपंपांचा प्रश्न आता चांगलाच तापला असून, याबाबत प्रशासनाला थेट जाब विचारण्यासाठी नागरिक आणि कार्यकर्ते पुढे सरसावले आहेत. तालुक्यातील बहुतांश हातपंप बंद अवस्थेत असल्याने संतप्त नागरिकांच्या वतीने तहसीलदार सिरोंचा तसेच संवर्ग विकास अधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले.
सदर निवेदनात नमूद केल्यानुसार, सिरोंचा शहर व तालुक्यातील सुमारे ५० पेक्षा अधिक हातपंपांपैकी जवळपास ९० टक्के हातपंप निकामी झालेले आहेत. शासनाकडून दरवर्षी हातपंप दुरुस्ती व नवीन हातपंप बसविण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला जात असतानाही, प्रत्यक्षात कामाच्या अंमलबजावणीत गंभीर त्रुटी असल्याचे दिसून येत आहे. अनेक ठिकाणी हातपंप केवळ उभे असले तरी त्यातून पाणी मिळत नसल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या प्रमाणात भटकंती करावी लागत आहे.
उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे परिस्थिती अधिकच बिकट बनली असून, काही भागात पाण्याची टंचाई तीव्र स्वरूप धारण करत आहे. अशा वेळी शासनाच्या योजना कागदावरच मर्यादित राहिल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. निधी मंजूर होऊनही दुरुस्ती न होणे, कामे अपूर्ण राहणे आणि देखभालीचा पूर्ण अभाव यामुळे संपूर्ण यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडे बंद पडलेल्या सर्व हातपंपांची तात्काळ दुरुस्ती करणे, आवश्यक त्या ठिकाणी नवीन हातपंप बसविणे, तसेच या कामांसाठी आलेल्या निधीच्या वापराची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच दोषी अधिकारी व कंत्राटदारांवर कठोर कारवाई करण्याचीही मागणी करण्यात आली.
दरम्यान, हे निवेदन तहसीलदार सिरोंचा व संवर्ग विकास अधिकारी यांना देण्यात आले. यावेळी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यात रवी चाकिनारापूवार, संदीप राचर्लावार, अभिलाष एडलावार यांच्यासह इतर कार्यकर्त्यांचा समावेश होता.
सिरोंचा तालुक्यातील पाणी प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला असून, प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलली नाहीत तर हा प्रश्न अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आता या निवेदनानंतर प्रशासन किती तत्परतेने कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
