युवराज मेश्राम प्रधान संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! नागपूर:- जिल्ह्यातील भिवापूर तालुक्यात एक भीषण वणवा पेटून अनेक घरे जाळून खाक झाल्याची माहिती मिळाली आहे. धामणगाव (विद्यामंदिर) येथे शनिवारी सायंकाळी 7.00 वाजताच्या सुमारास भीषण आग लागली या आगीत 4p पेक्षा अधिक घरे जळून खाक झाली. सुदैवाने या दुर्घटनेत कुठलीही मनुष्यहानी झाली नसली तरी अनेक जनावरे दगावल्याची माहिती मिळून आली आहे. या भीषण आगीत घरातील धान्य, कपडे, कागदपत्रे व जीवनावश्यक वस्तू पूर्णतः नष्ट झाल्याने गावातील अनेक कुटुंबे बेघर झाली आहेत.
गावात झुडपे व कचरा जाळण्यासाठी लावण्यात आलेल्या वनव्यामुळे ही भीषण आग लागली. त्यातच वाऱ्यामुळे आगीने क्षणार्धात रौद्र रूप धारण करत गावातील घरांना कवेत घेतले. विशेषतः पश्चिम भागातील वस्तीत मोठे नुकसान झाले. या घटनेची माहिती मिळताच नायब तहसीलदार रेखा निकम व पोलिस ठाणेदार रवींद्र मस्कर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
आगीची तीव्रता पाहता भिवापूर, उमरेड, भिसी, चिमूर व नागपूर येथून अग्निशमन दलाच्या गाड्या पाचारण करण्यात आल्या. मात्र, अरुंद रस्ते आणि आगीचा वेग यामुळे मोठ्या अडचणी आल्या. या भीषण आगीत अनेक जनावरे होरपळली आगीच्या तडाख्यात दोन बैल, एक गाय-वासरु तसेच सुमारे दहा शेळ्या होरपळून मृत्युमुखी पडल्या. काही जनावरे जखमी झाली आहेत. तसेच एक बुलेट दुचाकी आणि एक ऑटोही आगीत जळून खाक झाला. आग लागल्यानंतर नागरिकांनी जीव वाचवण्यासाठी घराबाहेर धाव घेत गावाबाहेरील रस्त्यांच्या कडेला आश्रय घेतला. पांढरवाणी, पुयारदंड व हत्तेबोडी मार्गावर कुटुंबियांसह लहान मुले, जनावरे आणि शक्य तितके सामान घेऊन नागरिक थांबलेले दिसून आले. सर्वत्र आक्रोशाचे वातावरण होते.
आगग्रस्तांसाठी शाळेत व्यवस्थाप्रशासनातर्फे काही आगग्रस्त नागरिकांची जिल्हा परिषद शाळेमध्ये तात्पुरती निवास व्यवस्था करण्यात आली आहे. तर काही नागरिकांनी नातेवाइकांकडे आश्रय घेतला आहे. घटनास्थळी महसूल विभाग, पोलिस विभाग तसेच पंचायत समितीची यंत्रणा तत्काळ कार्यरत झाली असून मदतकार्य सुरू आहे.
