१५ दिवसांत रुग्णवाहिका आणि फ्रीजर सुविधा सुरळीत करा; मुख्याधिकारी व नगराध्यक्षांना ‘AAP’चा निर्वाणीचा इशारा.
हनिशा दुधे चंद्रपूर उपजिल्हा प्रतिनिधी मो.9764268694
बल्लारपूर;दि.. ०४ मै
“नगरपालिका प्रशासन जनतेच्या सोयी-सुविधांच्या नावाखाली दरवर्षी लाखो रुपये खर्च करते. मात्र, हा खर्च केवळ कागदावरच मर्यादित न राहता ती सुविधा सामान्य जनतेपर्यंत पोहोचली पाहिजे. जनतेच्या करातून जमा झालेला पैसा जर त्यांना संकटकाळात मदत देऊ शकत नसेल, तर अशा सुस्त प्रशासनाचा उपयोग काय?” असा खडा सवाल आम आदमी पार्टीचे शहराध्यक्ष रवि पुप्पलवार यांनी उपस्थित केला. बल्लारपूर शहरातील रुग्णवाहिका, शववाहिका आणि फ्रीजर सुविधांच्या दुरवस्थेबाबत आज आम आदमी पार्टीच्या वतीने मुख्याधिकारी आणि नगराध्यक्षांना निवेदन देण्यात आले. यावेळी बोलताना पुप्पलवार यांनी प्रशासकीय निष्काळजीपणावर जोरदार प्रहार केला. शहरात मृत्यू झाल्यावर नागरिकांना नगरपरिषदेच्या मदतीऐवजी सामाजिक संस्थांकडे धाव घ्यावी लागते, ही मोठी शोकांतिका आहे. नगरपरिषदेकडे ३ ते ४ फ्रीजर असूनही ते वारंवार बंद असतात, रुग्णवाहिकेला ड्रायव्हर नसतो किंवा ती नादुरुस्त असते. “यंत्रणा असूनही ती वेळेवर न मिळणे हे प्रशासनाचे अपयश आहे. ९९% नागरिकांना या सुविधांपासून वंचित ठेवणाऱ्या जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे,” असे पुप्पलवार यांनी ठणकावून सांगितले. आता शहरात जनतेने निवडून दिलेले नगरसेवक आणि नगराध्यक्ष सभागृहात बसलेले आहेत. त्यामुळे प्रशासनाच्या या दिरंगाईला लोकप्रतिनिधींनी उत्तर दिले पाहिजे. उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच यंत्रणा सज्ज न झाल्यास मृतांच्या नातेवाईकांचे प्रचंड हाल होतील. येत्या १५ दिवसांच्या आत नगरपरिषदेच्या सभेत या सुविधा कार्यान्वित करण्याबाबतचा ठराव मंजूर करून त्या तात्काळ जनतेसाठी खुल्या कराव्यात, अशी आक्रमक मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
या निवेदनावेळी जिल्हा उपाध्यक्ष प्रा. नागेश्वर गंडलेवार, शहर अध्यक्ष रवि पुप्पलवार, उपाध्यक्ष अफजल अली, अजयपाल सूर्यवंशी, सुशील वासेकर, शेखर तेलरांधे, इम्तियाज खान यांच्यासह इत्यादी सहकारी उपस्थित होते.
