विश्वास त्रिभुवन, अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी
अहमदनगर:- दागिने खरेदी करण्यासाठी आलेल्या दोन महिलांनी सराफा व्यावसायिकांची नजर चुकवून पंधरा हजार रूपये किंमतीचे सोन्याचे झुबे चोरून नेल्याची घटना शहरातील एकनाथ नगर मध्ये घडली. कोतवाली पोलिसांनी दोन अनोळखी महिला विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत सराफा व्यावसायिक गोपेश संजय नागोरी वय 22, रा. श्रीमाया ज्वेलर्स नेप्ती रोड, एकनाथ नगर, अहमदनगर यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
दि.8 सकाळी 11.45 वाजताच्या सुमारास दोन अनोळखी महिला गोपेश नागोरी यांच्या दुकानात आल्या. त्यांनी नागोरी यांना सोन्याचे झुबे दाखविण्याचे सांगितले. दागिने पाहून झाल्यानंतर दोन्ही महिला दुकानातून निघून गेल्या. त्यानंतर 15 हजार किंमतीचे सोन्याचे झुबे कमी दिसल्याने महिलांनी चोरून नेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात अनोळखी महिलांविरोधात फिर्याद दिली. याबाबतचा अधिक तपास कोतवाली ठाण्याचे उपनिरीक्षक दुर्गे करत आहेत.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट ला www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

