महेंद्र कदम, संगमनेर तालुका प्रतिनिधी
संगमनेर:- तालुक्यातील तळेगाव दिघे येथे मागील भांडणाच्या कारणातून सरपंचासह तिघांनी गावातील भाजप कार्यकर्त्यास घरात घुसून जबर मारहाण केली या दरम्यान, त्यास चाकूचा धाक दाखविल्याची घटना सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली.
याप्रकरणी तळेगाव दिघेच्या सरपंचासह तीन जणांवर संगमनेर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
याबाबत संगमनेर तालुका पोलिसांनी सांगितले की, तालुक्यातील तळेगाव दिघे येथील चौफुलीवर लावलेला शुभेच्छा फलक फाडून, त्याचे तुकडे केले. याप्रकारामुळे भाजप कार्यकर्ते रामदास दिघे यांनी संगमनेर तालुका पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून तळेगावचे सरपंच बाबासाहेब प्रभाकर कांदळकरसह सचिन रामनाथ दिघे, मतीन चाँदभाई शेख व राहुल अशोक जगताप याच्याविरुद्ध अदखल पात्र गुन्ह्याची नोंद केली होती. यानंतर सरपंचासह चौघांना पोलिसांनी बोलवून घेत समज दिली होती.
या प्रकारामुळे या सर्वांचा राग अनावर झाला. शुक्रवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास रामदास दिघे यांच्या घरी सरपंच बाबासाहेब कांदळकर, शेतकी संघ संचालक सचिन दिघे व मतीन शेख आले, मात्र रामदास दिघे गावात किराणा आणण्यास गेले होते. या तिघांनी गावात साखर कारखाना गट ऑफिसजवळ अडवून, ‘तू जास्त शहाणा झाला का,’ असा सवाल करीत, ‘आमच्या विरोधात पोलिसात तक्रार देतो का रे,’ असे म्हणत अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करीत धक्काबुक्की करून मारहाण केली. शेतकी संघ संचालक सचिन दिघे याने रामदास दिघे यांच्या डाव्या हाताच्या कांबीवर चाकू मारून जखमी केले. दिघे यांच्या पत्नीसह भावजईला शिवीगाळ केली. दिघे यांना हाताला धरून, ‘तू बाहेर चल, तुझे तुकडे करून च टाकतो,’ असे म्हणत जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी तालुका पोलिसात रामदास दिघे यांच्या फिर्यादीवरून सरपंच बाबासाहेब प्रभाकर कांदळकर, शेतकी संघ संचालक सचिन रामनाथ दिघे व मतीन चांदभाई शेख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. पो. नि. सुनील पाटील व पो. उ. नि. विजय खंडिझोड पुढील तपास करीत आहेत.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट ला www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348