राजकिरण नाईक कुही तालुका प्रतिनिधी
कुही:- कुही येथील राणी इंदिराबाई भोसले महाविद्यालयात ‘शब्दशिल्प साहित्य व सांस्कृतिक मंडळ’ नागपूर व ‘राणी इंदिराबाई भोसले महाविद्यालय’ या परिवाराच्या संयुक्त विद्यमाने कवी, लेखक व संपादक कलाम अहमद खान यांचे पन्नासाव्या सुवर्णमहोत्सवी आयुष्यपर्वाचे व पाक्षिक वैदर्भीय ‘शब्दशिल्प’च्या रजतमहोत्सवाचे औचित्य साधून परिघातील त्यांचे मित्रमंडळींनी त्यांचे समाज, साहित्य व सांस्कृतिक कार्य, वाड्मयीन चळवळ, नवोदितांसाठींची लेखनविषयक प्रेरणा, संपादन व प्रकाशन याविषयीचे अखंड अविरत सेवातत्वावरील दखलपात्र कार्य लक्षात घेऊन त्यांचेवर सुवर्ण महोत्सवी शब्दशिल्पी गौरवग्रंथ काढला. प्रस्तुत गौरवग्रंथाचा प्रकाशन सोहळा व सत्कार सोहळा संयुक्त विद्यमाने पार पडला.
या प्रकाशन व गौरव सोहळ्याचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य गजानन मांडेकर होते. उद्घाटक म्हणून मुंबई येथील हिंदी चित्रपटाचे संकलक सिध्दार्थ कुलकर्णी तर लेखिका, सामाजिक कार्यकर्त्या डाॅ. संध्या पवार, व दै. लोकसत्ताचे वरिष्ठ उपसंपादक शफी पठाण हे भाष्यकार म्हणून तर ‘शब्दशिल्पी’ गौरवांकाचे संपादक श्री प्रभाकर तांडेकर ‘प्रदत्त’ हे उपस्थित होते.
प्रारंभी वाग्देवी शारदेचे पुजन करून कार्यक्रमास सुरवात झाली. पाहुण्यांचा परिचय व प्रास्ताविक गौरवग्रंथाचे संपादक प्रभाकर तांडेकर ‘ प्रदत्त ‘ यांनी उपस्थितांना करून दिला. यावेळी भाष्य करताना मा. शफी पठाण यांनी कलामखान यांचे काव्य व एकूण निर्मितीमागील झपाटलेपण श्रोत्यांसमोर विदीत केले. उभे आयुष्य भनंगासारखे राहून साहित्यसेवेला वाहून टाकलेला कलाम हा अजब अवलीया आहे; असे ते म्हणाले. तर, डाॅ.संध्या पवार यांनी स्वतः प्रकाशात न येता काळोखातील कंगोरे पुढे आणणारा कलाम हा दुर्लभ किमयागार आहे; असे त्या म्हणाल्या. तर सिध्दार्थ कुलकर्णी यांनी कलामभाई यांचे वाड्.मयीन कार्य व जीवनवास्तव पाहून कलामभाई ऐवजी कमालभाई म्हणेन; असे उच्चारण त्यांनी यावेळी केले. याच महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी कलाम साहित्य, प्रकाशन व पत्रकारिता या क्षेत्रात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीचा सामना करीत स्वतःला सिद्ध करतो; हे अनेकांसाठी प्रेरणादायी आहे असे गौरवोद्गार प्राचार्य श्री गजानन मांडेकर यांनी काढले.
या प्रसंगी श्री कलाम यांचा सपत्निक शाल श्रीफळ देऊन उचित गौरव करण्यात आला. महाराष्ट्रातील ख्यातनाम लेखक, कवी, पत्रकार, विचारवंत, समाजसेवक, संशोधक, प्राध्यापक, प्राचार्य अशा विविध क्षेत्रातील प्रतिभावंतांच्या लेखणीने कलाम पठाण यांच्या सर्वंकष लेखनकार्याचा संवेदनक्षम वेध प्रस्तुत गौरवग्रंथांत घेतलेला आहे. स्मृतीशेष नीलकांत ढोले व पैगंबरवासी हुस्नबानो पठाण यांच्या स्मृतीस अर्पण करण्यात आलेल्या या ग्रंथास कविवर्य अजिम नवाज राही, मा. घनशामजी धवड यांचे शुभेच्छा पत्र लाभले असून संपादकीय ‘प्रदत्त’ प्रभाकर तांडेकर यांचे आहे.
अत्यंत उत्साहात संपन्न झालेल्या या गौरवप्रकाशन सोहळ्याचे सुंदर संचलन मा. शरद शहारे यांनी केले; तर आभार प्रदर्शन प्रा.डाॅ. रमेश चौधरी यांनी मानले.
कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी प्रा.एस. एस. खेडीकर यांचेसह संजय टेकाम, भरत वानखेडे, विजय देशमुख, टेकेश्वर देशमुख तसेच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी चरणदास वैरागडे, प्रा.विनय पाटील, श्री सुरेश रंगारी, भोजराज साठवणे, डूमदेव सहारे, ज्योती बन्सोड यांची विशेष उपस्थिती होती. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.