राजेंद्र झाडे, चंद्रपूर उपजिल्हा प्रतिनिधी
बल्लारपूर/चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्याच्या कोठारी राष्ट्रीय महामार्गावर आज सकाळी शनिवारला रस्ता अपघातात एका शिक्षकाची प्राणज्योत मालवली तर त्याची पत्नी याच अपघातात गंभीर जखमी झाल्याची दूदैवी घटना घडली. या बाबत हाती आलेल्या माहितीनुसार असे कळते की जिल्हा परिषद शाळेत शिक्षक असणारे टिचर काॅलनी बल्हारपूर येथील पती – पत्नी आज सकाळी सात वाजताच्या दरम्यान आपल्या कार्यरत असलेल्या कळमना व पळसगाव शाळेला दुचाकी वाहनाने जात असताना मौनफोर्ट कॉन्व्हेन्ट जवळ त्यांचे दुचाकीला रानटी डुक्कराने जबर धडक दिली. त्यामुळे ते दोघेही दुचाकी वरुन रस्त्यावर कोसळले. त्यात ४९वर्षिय शिक्षक नामे सुनिल पत्रु कोवे यांची घटनास्थळीच प्राणज्योत मालवली. तर ४४ वर्षिय शिक्षिका शालीनी सुनील कोवे ह्या या रस्ता अपघातात गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे. सदरहु अपघाताचा पुढील तपास बल्लारपूर पोलिस स्टेशनचे पोलीस पथक व वन विभागाचे अधिकारी करीत असल्याचे समजते.
शनिवार सकाळची शाळा असल्यामुळे नेहमी प्रमाणे ते पती पत्नी बल्लारपूर तालुक्यातील पळसगाव व कळमना येथे आपल्या शाळेत कामावर जात होते. सकाळी ७ वाजताच्या दरम्यान दोघेही आपल्या बल्हारपूर येथील टिचर काॅलनी निवासस्थानावरुन निघाले होते.परंतु बल्लारपूर – कोठारी राष्ट्रीय महामार्गावर अचानक रानटी डुक्कराने त्यांचे दुचाकी वाहनाला जबर धडक दिली. त्यातच हा अपघात घडल्याचे बोलल्या जाते.सदरहु घटनेत गंभीर जखमी झालेल्या शालीनी कोवे यांना बल्लारपूर पोलिसांनी तातडीने उपचारार्थ चंद्रपूरला हलविले असून सध्या त्यांचेवर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे समजते .
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट ला www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348