बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांनी नागपूर धम्मदीक्षा नंतर चंद्रपूरलाही तसाच धम्मदीक्षेचे सोहळा व्हावा म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनंती केली. बाबासाहेबांना नागभूमी नागपूर आणि बौद्ध नगरी भद्रावती या दोन्ही भूमिची ऐतिहासिक माहिती असल्यामुळे बाबासाहेबांनी त्यांना होकार दिला व चंद्रपूर साठी बाबासाहेबांनी १६ ऑक्टोबर १९५६ ही तारीख निश्चित केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक समतेच्या क्रांतीकारी लढ्यात चंद्रपूर शहराचे अति महत्त्व आहे. देवाजी भिवाजी खोब्रागडे यांचे जेष्ठ सुपुत्र राजाभाऊ खोब्रागडे इंग्लंड वरून उच्च शिक्षण घेऊन आपल्या मायभूमीत आले, तेव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सूचनेप्रमाणे देवाजी बापू खोब्रागडे यांनी त्यांच्या मानवमुक्तीच्या लढ्यासाठी आपला मुलगा त्यांना अर्पण केला. बॅरिस्टर राजाभाऊंनी आपल्या जीवनाच्या अंतिम क्षणापर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आरंभिलेले क्रांतिकारी कार्य कटाक्षाने पार पाडले. त्यामुळे या एतिहासिक चंद्रपूर नगरीचे नाव आंबेडकरी चळवळीत सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले.
१६ ऑक्टोबर १९५६ चा दिवस चंद्रपूर शहराच्या इतिहासात सर्वांच्या जीवनात मुक्ती दिवस ठरला. त्याचे सर्व श्रेय बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांना आहे. नागपुर वरून डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्याम हॉटेल मधून चंद्रपूरला जाण्यासाठी १६ ऑक्टोबर १९५६ ला सकाळी ५ वाजता निघाले. बाबासाहेबांना खाजगी मोटारीने उमरेड, भिवापूर, नागभीड, मूल या मार्गाने आणण्यात आले. रस्ता त्यावेळी फार खराब व कच्चा असल्याने बाबासाहेबांना फार त्रास झाला. रस्त्याने कुठे न्याहारीची व्यवस्था नसल्याने बाबासाहेबांना भूक लागली. तसे त्यांनी सोबत असलेले चंद्रपूरचे लक्ष्मणराव जुलमे यांना सांगितले. त्यांनी मग उषाबाई लिंगाणी गोवर्धन यांना घरी जाऊन सांगितले. की,”आज तुमचा फार सुंदर योग आला आहे. तुमच्या हातची भाकरी, भाजी एक बोधिसत्व ग्रहण करणार आहे. म्हणून लवकरात लवकर ज्वारीची भाकरी अन असेल ती भाजी बनवा. “ते ऐकून त्या मातेला खूप आनंद झाला आणि त्या मातेने क्षणाचाही विलंब न करता ज्वारीची भाकरी आणि अंड्याची चटणी करून दिली. बाबासाहेबांनी विश्रामगृहात मोठ्या चवीने ती खाल्ली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची खाजगी मोटार सरकारी सर्किट हाऊस, चंद्रपूरच्या स्वागत गेट वर येताच डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या मोटारीतून उतरून तेथे स्वागतास उभे असलेल्या समता सैनिक दलाची सलामी स्वीकारण्यास उभे होताच, पुंडलिक बालाजी देव यांनी आदेश देता क्षणी राजाराम नारायण रामटेके यांनी बिगुल वाजवून ६०० समता सैनिक दलाच्या तुकडीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना सलामी दिली. त्यावेळेस दुपारचे ४ वाजले होते.
सायंकाळी ६ वाजता बाबासाहेबांना घेण्यासाठी काही कार्यकर्ते मंडळी आली. तेव्हा बाबासाहेब म्हणाले,” चंद्रपूरला आलो हेच पुष्कळ झाले आता स्टेजवर जाण्याची काही आवश्यकता नाही.” परंतु कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे सायंकाळी ६:३० वाजता दीक्षाभूमीच्या कार्यक्रमास जाण्यासाठी ते तयार झाले. सायंकाळी ७ वाजता ते नियोजित धम्मदीक्षेच्या स्थळी आले. येथील धम्मदीक्षा साठी तयार केलेल्या भव्य स्टेज हा उंच दो मजली पूर्वमुखी होता. या स्टेजवर जाण्यासाठी दक्षिणेकडून वर जाण्यास पायऱ्या होत्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सविता आंबेडकर व नानकचंद रत्तू यांच्या खांद्याचा आधार घेऊन त्या भव्य स्टेज वरील शमियानात चढले. स्टेजवर येताच तेथे उपस्थित लाखो लोकांनी उभे राहून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे हर्ष उल्हासात स्वागत केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयजयकाराने वातावरण दुमदुमून गेले. लोकांचा उत्साह पाहून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यास प्रतिसाद देण्यासाठी हात उंचावला नंतर काठीच्या आधाराने ते खुर्चीवर बसले.
धम्मदीक्षा स्टेजवर एका उंच टेबलावर भगवान बुद्धांची प्रतिमा ठेवण्यात आली. बुद्ध प्रतिमेच्यासमोर मेणबत्ती व अगरबत्ती लावण्यात आली. आणि बुद्ध प्रतिमेला फुले वाहण्यात आली. त्यानंतर अनेक संस्थांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना पुष्पहार अर्पण करण्यात आले. लाखो लोक धम्मदीक्षा घेण्यासाठी पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून आले होते. त्यावेळी असे सांगण्यात येते की, चंद्रपूरच्या बाजारपेठेतील पांढरे कापड हा हा म्हणता संपून गेले होते. पांढऱ्या कपड्यातील स्त्री-पुरुषांच्या चेहर्यावर उत्साह आणि आनंद दिसत होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रकृती बरी नसल्यामुळे ते खुर्चीतच बसून सर्वांना हात जोडा म्हणून त्यांनी आदेश दिला. सर्वांनी हात जोडले. त्यावेळी तिथे एवढी शांतता होती की, ते सर्व जनसागर समुद्राप्रमाणे शांत होता. नंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी उपस्थित लोकांना त्रिशरण, पंचशील आणि धम्मदीक्षा दिली. नंतर बाबासाहेबांनी २२ प्रतिज्ञा दिल्या. चंद्रपूरला तीन लाख लोकांनी धम्मदीक्षा घेतली. दीक्षा विधी समारंभ समारंभाच्या वेळी समता सैनिक दलाच्या सैनिकांनी चोख व्यवस्था ठेवली होती. कुठेही पोलीस बंदोबस्त नव्हता. डॉ. बाबासाहेबांनी यावेळी कोणतेही भाषण केले नाही. ते स्टेजवरून खाली उतरले आणि सरळ चंद्रपुर सर्किट हाऊसमध्ये त्यांना नेण्यात आले. सर्किट हाऊसमध्ये त्यांची भोजनाची व्यवस्था करण्यात आली. चंद्रपूर सर्किट हाऊसच्या अवतीभोवती समता सैनिक दलाचा कडेकोट पहारा होता.
१७ ऑक्टोबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या दर्शनासाठी चंद्रपूर सर्किट हाऊस वर महिला व पुरुषांनी एकच गर्दी केली. त्यावेळी बाबासाहेबांनी त्यांना मार्गदर्शन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भेटायला वेळ आणि बघायला मोठ्या संख्येने लोक येऊ लागले. माईसाहेबांना ते पटत नव्हते. म्हणून बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांनी मोठ्या प्रयत्नांनी माईसाहेबांना आपल्या घरी नेले. त्यांना साडीचोळी देऊन त्यांचा सम्मान केला. या वेळात बाबासाहेब सर्वांशी मोकळेपणाने बोलले. बोलण्यात वेळ कसा निघून गेला हे कळलेच नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मार्गदर्शन करून शेवटी म्हणाले,” “आता या नंतर मी तुम्हाला दिसणार नाही!” यांच्या तोंडून हे वाक्य बाहेर पडताच तेथे उपस्थित सार्या स्त्रिया रडायला लागल्या. पुरूषही रडू लागले. बाबासाहेबांनी सर्वांना समजावले. रडू नका. पण त्यांचे रडणे थांबेना. तेंव्हा बाबासाहेबांच्या डोळ्यातूनही अश्रू ओघळू लागले. आपल्या लेकरांचे आपल्यावरील प्रेम पाहून त्यांनाही रडू आले. हा प्रसंग हृदयाला भिडणारा होता. आपला उद्धारकर्ता आता आम्हास भेटणार नाही, दिसणार नाही, आता आमचा वाली कोण?आमच्यावरील अन्याय,अत्याचार कोण दूर करील? या विचाराने सर्व शोकाकुल ह्रदयाने गदगद झाले.
ठरल्याप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर नागपूरला जाण्यासाठी चंद्रपूर सेंट्रल रेल्वे स्टेशनवर समता सैनिक दलाच्या सैनिकांनी शिस्तीमध्ये त्यांची मोटार रेल्वे स्टेशनवर घेऊन आले. तेथे येथील सर्व कार्यकर्ते बाबासाहेबांना निरोप देण्यास हजर होते. चंद्रपूर वरून जी.टी. एक्सप्रेस गाडी निघताच ‘भगवान बुद्ध की जय!’ ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर की जय’ गगनभेदी जयजयकारात बाबासाहेबांना सर्वांनी जड अंत:करणांनी निरोप दिला. गाडी दिसेनाशी होईपर्यंत सर्व लोक तिथेच थांबून त्यांना हातवारे करीत होते. शेवटी पाणावल्या डोळ्यांनी सर्वजण तिथून जाऊ लागली…!!!
१६ ऑक्टोबर १९५६ चंद्रपूर ऐतिहासिक धम्मदीक्षा निमित्त सर्व भीमसैनिकांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट ला www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348