मानवेल शेळके, नाशिक जिल्हा प्रतिनिधी
नाशिक:- प्लास्टिकमुक्त शहराचा निर्णय झाला असताना प्लास्टिकचा वापर करणार्यांविरोधात महापालिकेने मोहीम हाती घेतली आहे. या कारवाईत ११ किलो प्लास्टिक जप्त करत पथकाने ३० हजारांचा दंड वसूल केलाआहे. यानिमित्ताने शहरात किरकोळ व्यापार्यांपासून ते मोठ्या दुकानांमध्येही बंदी घाललेल्या प्लास्टिकच्या पिशव्यांचा मोठा वापर सुरू असल्याचे उघड झाले आहे.
भाजीपाल्याच्या दुकानांमध्ये प्लास्टिक पिशव्यांचा आजही सर्रास वापर सुरू आहे. त्यातच दिवाळीत बंदी घालेल्या प्लास्टिकचा बेसुमार वापर सुरू आहे. ही बाब लक्षात घेऊन महापालिकेने धडक मोहीम हाती घेतली आहे. शहर प्लास्टिकमुक्त करण्यासाठी महापालिकेने व्यापक मोहीम हाती घेतली आहे. महापालिकेच्या विविध विभागांकडून करण्यात आलेल्या अशा कारवाईत व्यावसायिकांकडून ३० हजार रूपये दंड वसूल करण्यात आला.
महापालिकेने शहरात कोणत्याही जाडी-लांबी असलेल्या प्लास्टिकचा वापर, विक्री, साठवणूक करण्यास पूर्णपणे बंदी घातली आहे. प्लास्टिकसारख्या अविघटनशील कचर्यामुळे सार्वजनिक आरोग्यावर विपरीत होत असल्याने शहर टास्क फोर्सने शहरात पूर्णतः प्लास्टिक बंदी केली आहे. आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेत झालेल्या बैठकीत पूर्णतः प्लास्टिकबंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार शहरातील सहाही विभागातून कारवाई सुरू आहे. प्रतिबंधित प्लास्टिक कॅरी बॅग, डिश, ग्लास यांचा वापर करताना आढळून आले.
बांधकाम व्यावसायिकांवरही कारवाई
नवीन नाशिकचे विभागीय अधिकारी डॉ. मयूर पाटील, विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय गांगुर्डे यांच्या नेतृत्वाखाली गोविंद नगर येथील आर. डी. सर्कलवरील बांधकाम व्यावसायिक कंपनीवर कारवाई करण्यात आली. बांधकाम मटेरियलची माती रेबिट रस्त्यावर आल्याने संबंधितास 25 हजार रुपये दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. नवीन नाशिक विभागातर्फे प्रतिबंधीत प्लास्टिकचा वापर आणि अस्वच्छता करणे अशा एकूण ३ केसेसमधून ६,७८० रुपये दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे

