मानवेल शेळके, नाशिक जिल्हा प्रतिनिधी
इगतपुरी/घोटी :- तालुक्यातील घोटी परिसरात शनिवारी दि. 14 मध्यरात्री उशिरा दरोडेखोरांनी दोन ठिकाणी सशस्त्र दरोडा घालत 3 लाख 38 हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. त्यांनी घरातील महिला आणि लहान मुलांच्या कानातले सोन्याचे दागिने अक्षरशः खेचून नेले. प्रतिकार करणार्या व्यक्तींवर दरोडेखोरांनी तलवारीने वार केले आहे. या घटनेने घोटी गाव हादरले असून, शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण सर्वत्र पसरले आहे.
घोटी रेल्वे ठाणे परिसरातील भदे मळा येथे राहाणारे श्रीकांत भदे यांच्या घरावर शनिवारी मध्यरात्रीनंतर 2 ते 3 च्या सुमारास चार ते पाच सशस्त्र दरोडेखोरांनी दरवाजाचा कडी-कोयंडा तोडत घरात प्रवेश केला. त्यांनी घरातील काही लोकांना मारहाण करीत सोन्याचे दागिने व रोकड घेऊन पोबारा केला. या घटनेत अलका जयवंत भदे यांच्या गळ्यातील 35 हजार रुपये किमतीचे सोन्याचे एक तोळे वजनाचे मणीमंगळसूत्र, सासरे जयवंत भदे यांची 35 हजार रुपये एक तोळे सोन्याची पोत, अलका जयवंत भदे यांच्या दोन्ही कानांतील साडेपाच ग्रॅम वजनाचे 18 हजारांचे सोन्याचे झुबे, मुलगा श्रेयस याचे दोन्ही कानांतील साडेपाच ग्रॅम वजनाचे 8 हजार रुपयांचे सोन्याचे पदके, 80 हजार रुपयांची रोकड, 30 हजार रुपये किमतीचे सॅमसंग व नोकिया कंपनीचे दोन मोबाइल असा एकूण 2 लाख 6 हजारांचा ऐवज चोरून नेल्याची फिर्याद संध्या श्रीकांत भदे यांनी घोटी पोलिस ठाण्यात दिली आहे. या घटनेत अलका जयवंत भदे, जयवंत भदे, श्रीकांत भदे यांना दरोडेखोरांनी मारहाण केली. दुसर्या घटनेत याच परिसरातील जावेदभाई गणी खान यांच्यावर तलवारीने वार करून जखमी केले आहे. गणी खान यांच्या घराचा दरवाजा तोडून दरोडेखोरांनी चाकू व तलवारीचा धाक दाखवत 30 हजार रुपये किमतीची सोन्याची पोत, पाच ग्रॅम वजनाचे 15 हजारांचे सोन्याचे मंगळसूत्र, तीन ग्रॅम वजनाची 10 हजारांची सोन्याची चेन, पाच ग्रॅम वजनाचे 10 हजारांचे सोन्याचे झुबे, 2 हजारांची सोन्याची मुरणी, सोन्याची चेन, पती जावेद यांच्या एक तोळा वजनाच्या 30 हजारांच्या सोन्याच्या दोन अंगठ्या, 30 हजार रुपये रोकड, 3 हजारांचा सॅमसंग कंपनीचा मोबाइल असा एकूण 1 लाख 32 हजारांचा ऐवज चोरला आहे. घटनेतील जखमींवर घोटी व नाशिक येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनास्थळी अप्पर पोलीस अधिक्षक माधुरी कांगणे, पोलीस उपअधिक्षक अर्जुन भोसले, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी भेट दिली. पोलिस उपअधीक्षक भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक दिलीप खेडकर, सहायक पोलिस निरीक्षक श्रद्धा गंधास, पोलिस उपनिरीक्षक संजय कवडे, पोलिस हवालदार शीतल गायकवाड, प्रसाद दराडे, धर्मराज पारधी आदी पोलिस अधिकारी तपास करीत आहेत.