मानवेल शेळके, नाशिक जिल्हा प्रतिनिधी
नाशिक:- नाशिक मधील शिवसेनेच्या शिंदे आणि ठाकरे गटाचे महानगरप्रमुख आमने सामने आले आहेत. ठाकरे गटाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी काल महापालिकेच्या म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेच्या कार्यालयाचा ताबा घेतला.
त्याविरोधात आता शिंदे गटाचे महानगरप्रमुख प्रवीण तिदमे यांनी थेट पोलिसांकडे तक्रार केली. कार्यालयाचा बेकायदेशीरपणे ताबा घेणे, तेथील महत्वाची कागदपत्रे व दस्तेवज परस्पर ताब्यात घेणे व गहाळ करण्याचा आरोप तिदमे यांनी केला . याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली. त्यामुळे आता पुढे काय होणार याकडे सगळ्यांचे लक्ष केंद्रित झाले आहे.
तिदमे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, मी नाशिक महानगरपालिकेत मागील पंचवार्षिक निवडणुकीत नगरसेवक म्हणून निवडून आलेलो असून, माझी सदस्यांनी बहुमताने म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेच्या अध्यक्षपदी निवड केलेली आहे. तसेच नाशिक महानगरपालिकेच्या वतीने मला कार्यालय देखील अलोट केलेले आहे. मागील महिन्यामध्ये माझी बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या महानगरप्रमुखपदी निवड झालेली असल्याने सदर बाब सहन न झाल्याने काही संधिसाधू व कुप्रवृत्तीच्या लोकांनी मी अध्यक्ष असलेल्या म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेच्या अध्यक्षपदावर दावा सांगण्यास सुरुवात केली, तसेच मला अलोट केलेले कार्यालय देखील बळकावण्याचे प्रयत्न केले. परंतु मी कायदेशीर प्रक्रीयेद्वारे माझी निवड योग्य असल्याचा निर्वाळा मे. कामगार उपायुक्त यांनी दिल्यानंतर देखील सदरील व्यक्तींनी काही न काही कुरापती सुरूच ठेवल्या, असे तिदमे यांनी म्हटले.
तिदमे यांनी तक्रारीत पुढे म्हटले आहे की, मुख्यमंत्री साहेब यांचा नाशिक येथे पूर्वनियोजित दौरा असल्याने मी सदरील दौर्याच्या नियोजनामध्ये मागील ३ ते ४ दिवसांपासून व्यस्त असल्याने मला माझ्या नाशिक महानगरपालिकेतील कार्यालयात जाण्यास वेळ मिळाला नाही. तसेच आज रोजी मी मा. मुख्यमंत्री साहेब यांच्या सोबत विविध कार्यक्रमामध्ये व्यस्त असताना सुधाकर बडगुजर, रवि येडेकर यांसह सुमारे १०० ते १५० लोकांनी संगनमत करून कोणत्याही संविधानिक किंवा कायदेशीर पदावर नसतांनादेखील माझ्या नाशिक महानगरपालिकेतील कार्यालयात बेकायदेशीररित्या प्रवेश करून तेथील संघटनेची अत्यंत महत्वाची कागदपत्रे परस्पर ताब्यात घेऊन गहाळ केलेली आहेत. सदरच्या व्यक्तींनी या पूर्वी देखील माझ्या कार्यालयात अनधिकृतरीत्या प्रवेश करण्याचा प्रयत्न केला असतांना पोलीस प्रशासनाने त्यांना वेळीच रोखल्याने अनर्थ टळला होता. तसेच सुधाकर बडगुजर यांना स्वताहून पदाधिकारी होण्याचा किंवा नेमण्याचा कोणताही कायदेशीर अधिकार नाही. आमच्या संघटनेच्या घटनेतील तरतूद पाहता ते अनाधिकाराने व सभासद कर्मचारी यांच्या इच्छेविरुद्ध स्वतःहून पदाधिकारी म्हणून घोषित करीत आहेत जे नियमबाह्य व बेकायदेशीर आहे, असा आरोप तिदमे यांनी केला.
तिदमे यांनी तक्रारीत लिहिले आहे की, मुख्यमंत्री साहेबांचा नाशिक दौरा असल्याने मी व माझे पदाधिकारी दौर्याच्या नियोजनात तसेच संपूर्ण जिल्ह्याचे पोलीस प्रशासन हे कायदा व सुरक्षेच्या कारणामुळे बंदोबस्तामध्ये व्यस्त असल्याने या संधीचा गैरफायदा घेऊन उपरोक्त व्यक्तींनी अनधिकृतरीत्या माझ्या कार्यालयाचे कुलूप तोडून त्यात प्रवेश केलेला आहे तसेच तेथील अत्यंत महत्वाची कागदपत्रे ताब्यात घेऊन गहाळ केलेबाबत माझी आपल्याकडे कायदेशीर फिर्याद आहे. सबब माझी आपणास विनंती आहे कि, आपण न्यायप्रिय अधिकारी असून माझ्या फिर्यादीची तात्काळ दखल घेऊन संबंधित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून कठोर स्वरुपाची कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी तिदमे यांनी केली.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348