✒️प्रविण जगताप हिंगणघाट ✒️
वर्धा, :- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त दि.9 ते 17 ऑगस्ट दरम्यान स्वराज्य महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. या महोत्सवाच्या कालावधीत सर्व शासकीय कार्यालयांनी सामाजिक व स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने विविध उपक्रम, शासकीय योजनांची जनजागृती शिबिरे, विविध स्पर्धा, चित्रप्रदर्शनी, पदयात्रा, सायकल रॅली यासारखे उपक्रम राबवून कामे योग्य रितीने पार पाडावे, अशा सूचना जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी केल्या.
स्वराज्य महोत्सव अंमलबजावणी समितीची बैठक जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यावेळी त्यांनी सर्व संबंधित विभागांना सुचना दिल्या. बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सचिन ओम्बासे, जिल्हा पोलिस अधिक्षक प्रशांत होळकर, निवासी उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे, अपर जिल्हाधिकारी मनोजकुमार खैरनार, अपर पोलिस अधिक्षक यशवंत सोळंके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) ज्ञानदा फणसे, सार्वजनिक बांधकामचे कार्यकारी अभियंता प्रकाश बुब, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी डॉ. विद्या मानकर व सर्व संबंधित विभाग प्रमुख उपस्थित होते.
महोत्सवादरम्यान दि. 13 ते 15 ऑगस्ट रोजी सर्व शासकीय कार्यालये, खाजगी कार्यालये, शाळा, संस्थां व नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने आपल्या घरावर ध्वज लावावयाचा आहे. दि.15 ऑगस्ट रोजी सर्व शासकीय कार्यालयात करण्यात येणारे ध्वजारोहण मुख्य ध्वजारोहण कार्यक्रमापुर्वी किंवा कार्यक्रमानंतर करण्यात यावे. सर्व शासकीय कार्यालये ध्वज दररोज सुर्योदयानंतर लावावे व सुर्यास्तापुर्वी उतरवावे. खाजगी व्यक्तींनी आपल्या घरावर लावलेल्या ध्वज सलग तीन दिवस ठेवता येणार आहे. परंतु ध्वजाचा अवमान होऊ नये याची काळजी घेणे आवश्यक आहे.
स्वराज्य महोत्सव दरम्यान दि.9 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता सर्व शाळा, विद्यापीठे, महाविद्यालय व शैक्षणिक संस्थामध्ये एकाच वेळी राष्ट्रगीताचे आयोजन करुन यामध्ये शासकीय अधिकारी, कर्मचारी व नागरिकांना सहभागी करुन घेतले जातील. दि.11 ते 13 ऑगस्ट दरम्यान सर्व नगर पालिका त्यांच्या क्षेत्रातील हुतात्मा स्मारकांचे सुशोभिकरण, दि. 8 ते 10 ऑगस्ट दरम्यान सकाळी ग्रामसभा, दि.12 ते 17 ऑगस्ट सकाळी 11 वाजता जिल्हयातील अनाम वीर, स्वातंत्र्य चळवळीतील हुतात्मे यांचे दुर्मिळ फोटो व त्यांच्या कार्याची माहिती गावातील रस्त्यांच्या कडेला नगर पालिका व नगर पंचयातीं द्वारे लावली जातील.
शिक्षण विभागाच्यावतीने शाळेच्या विद्यार्थ्यांची प्रभातफेरी काढून त्यात नागरिकांना सहभागी करुन घेतले जातील. तसेच विविध स्पर्धेचे आयोजन केले जातील. स्वातंत्र्याचा वारसा असलेल्या ठिकाणी ऐतिहासिक पदयात्रा, प्रदर्शने, भरविण्यात येतील. दि. 9 ते 17 ऑगस्ट दरम्यान जिल्हा स्तरावर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयेाजन करण्यात यावे. व सर्व शासकीय कार्यालयाच्या इमारतीवर आझादी का अमृत महोत्सवाचा लोगो लावण्याच्या सूचनाही यावेळी जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी दिल्या. तसेच या दरम्यान सर्व शासकीय कार्यालया मार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनाची जनजागृती , बँकानी कर्ज मेळावे, यासारखे शिबिराचे आयोजन करण्याच्या सूचनाही दिल्या आहे।