शुभम ढवळे मालेगाव तालुका प्रतिनिधी
वाशिम:- भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्हा परिषद वाशिम येथील इमारतीत उमेदच्या महिला बचत गटामार्फत राष्ट्रध्वज विक्री केंद्र आज ३ ऑगस्ट रोजी सुरू करण्यात आले.
या विक्री केंद्राचे उद्घाटन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. विनोद वानखेडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विवेक बोन्द्रे, दिगांबर लोखंडे, संजय जोले, जिल्हा परिषदेचे जिल्हा जलसंधारण अधिकारी लक्ष्मण मापारी, तसेच इतर विभाग प्रमुख उपस्थित होते.
बचत गटामार्फत राष्ट्रध्वजांची विक्री करण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्टपर्यंत आपल्या घरावर तिरंगा ध्वज लावण्याबाबत प्रवृत्त करण्यात येणार आहे. उमेद अंतर्गत ग्रामीण भागातील महिला बचत गटांमार्फत “घरोघरी तिरंगा ” हे अभियान यशस्वी करण्याकरिता पुढाकार घ्यावा. असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसूमना पंत यांनी केले आहे .