✒️युवराज मेश्राम, विदर्भ ब्यूरो चीफ
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन
नागपूर:- आजपासून महाराष्ट्र राज्याच्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सूप वाजणार आहे. यावेळी विरोधक सरकारला घेरण्यासाठी पूर्ण तयारीनिशी कामाला लागली आहे. यावेळी महत्वाच्या विविध मुद्दय़ांवरून विरोधक आणि सरकारला समोरासमोर येण्याची चिन्ह दिसत आहे, तर सडेतोड उत्तर देण्याची सरकारची तयारी असल्यामुळे आजचे हिवाळी अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. या अधिवेशनात विशेषत: राष्ट्रपुरुषांच्या अवमानावरून सरकारला घेरण्याचा इशारा विरोधकांनी दिला आहे. तसेच लोकायुक्त कायद्याचं बिल देखील अधिवेशनात मांडण्यात येणार आहे. सत्तांतर झाल्यानंतर दुसऱ्यांदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अधिवेशनात विरोधकांचा सामना करणार आहेत. अर्थात त्यांच्या सोबतील नागपूरकर असलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील असणार आहेत. मात्र अजित पवारांसारखा विरोधी पक्ष नेता आणि सोबतीला राष्ट्रवादी, शिवसेना (ठाकरे गट), काँग्रेससारखे तगडे विरोधक समोर असणार आहेत. नागपुरात पार पडत असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला उद्धव ठाकरे देखील उपस्थित राहणार आहेत.
विरोधक सरकारला घेरणार?
नागपुरात राज्य विधिमंडळाचे आजपासून हिवाळी अधिवेशन सुरू होणार असून सीमाप्रश्न, पीक विम्यातील शेतकऱ्यांची फसवणूक, राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी, विकासकामांवरील स्थगिती, राष्ट्रपुरुषांच्या अवमान आदी मुद्दय़ांवरून विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता आहे.
महाविकास आघाडीच्या आमदारांची बैठक.
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मविआच्या आमदारांची आज बैठक होणार आहे. नागपूर विधान भवनात सकाळी 10 आणि दुपारी चार वाजता ही बैठक होईल. हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महाविकास आघाडीची बैठक नागपुरात आयोजित करण्यात आली असून या बैठकीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत. हिवाळी अधिवेशनानिमित्ताने विरोधी पक्षनेते अजित पवार यांची काल पत्रकार परिषद झाली. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. ही आज बैठक होणार आहे, तसेच उद्धव ठाकरे विधान परिषदेच्या कामकाजातही सहभागी होण्याची शक्यता आहे. असेही सांगितले.
विधानसभेवर आज सहा मोर्चे…
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात आज सहा मोर्चे निघणार आहेत. त्यामध्ये धनगर समाजाचा मोर्चा, विदर्भ जन आंदोलन समितीचा मोर्चा तसेच आशा गटप्रवर्तकांचा मोर्चा महत्त्वाचा ठरणार आहे.
23 विधेयके प्रस्तावित..
सरकारकडून 23 विधेयके प्रस्तावित आहेत. तर 5 अध्यादेश देखील पटलावर ठेवण्यात येणार आहेत. 23 अध्यादेशांपैकी मंत्रिमंडळाची मान्यता प्राप्त 12 विधेयकं आहेत तर मंत्रिमंडळ मान्यता सापेक्ष 11 विधेयकं आहेत. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात महाराष्ट्र लोकायुक्त विधेयक, 2022 मान्यतेसाठी मांडण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले होते.
सात मार्गावरील वाहतूक वळवली
दरम्यान अधिवेशनासाठी नागपूर शहर देखील सज्ज झालं आहे. अधिवेशनामुळं शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत. विधानभवनाचे कामकाज सुरू असताना सात मार्गावरील वाहतूक वळवण्यात आली असून चार मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर 18 ठिकाणी वाहतूक संथ होणार असल्याचे वाहतूक पोलिसांनी सांगितले आहे.
सत्तांतर नंतर नागपूरमध्ये पहिले अधिवेशन
महाविकास आघाडी सरकारच्या काळात डिसेंबर 2019 मध्ये नागपुरात हिवाळी अधिवेशन पार पडलं होतं. त्यानंतर कोरोना प्रादुर्भावामुळं नागपूरऐवजी मुंबईतच अधिवेशन पार पडले होते. आता राज्यात सत्तांतर झाल्यानंतर नागपूरमध्ये पहिलंच हिवाळी अधिवेशन पार पडत आहे. सत्तांतरांनंतर ऑगस्ट महिन्यात पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनाच्या कामकाजापासून उद्धव ठाकरे दूर राहिले होते.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

