नितीन शिंदे मुंबई महानगर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील साफ सफाई बाबत, उद्यानाबाबत प्राप्त तक्रारी, अनधिकृत बांधकामे, अतिक्रमण, रस्त्यावरील खड्डे, रस्त्यावर अनधिकृतरित्या बसणारे फेरीवाले या नागरिकांच्या सततच्या प्राप्त होणाऱ्या तक्रारी लक्षात ठेवून आयुक्त तथा प्रशासक श्री. दिलीप ढोले यांनी दिनांक 02 जानेवारी रोजी झालेल्या आढावा बैठकीत “वॉक विथ कमिशनर” पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार दिनांक 03 जानेवारी 2023 रोजी “वॉक विथ कमिशनर” या संकल्पनेतून सकाळी 8.00 वाजल्यापासून मॅक्सस मॉल पासून माहेश्वरी भवन या परिसराचा पाहणी दौरा केला. सदर पाहणी दरम्यान अतिरिक्त आयुक्त संभाजी पानपट्टे, उपायुक्त (मुख्यालय) मारुती गायकवाड, उपायुक्त (उद्यान) संजय शिंदे, उपायुक्त (सार्व. आरोग्य) रवी पवार, उपायुक्त कल्पिता पिंपळे, शहर अभियंता दिपक खांबित, अतिरिक्त शहर अभियंता सुरेश वाकोडे, प्रभाग अधिकारी, सहाय्यक आयुक्त, महानगरपालिका अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
सदर पाहणी दरम्यान आयुक्त यांनी गांधी नगर, भोला नगर व डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर याठिकाणी फुटपाथवरील टपऱ्या, अनधिकृत शेड, फेरीवाले, अनधिकृतरीत्या विजेच्या पोलवर लावण्यात आलेले बॅनर यांच्यावर तातडीने कारवाई करण्याचे निर्देश अतिक्रमण विभागास दिले. फूटपाथ व रस्त्यांवर काही ठिकाणी गटारांची तुटलेली झाकणे ही नव्याने बसविण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंताना देण्यात आले. तसेच रस्त्याच्या कडेला व फुटपाथवर पडलेले डेब्रिज उचलण्याचे निर्देश देण्यात आले. रस्त्यावर प्रत्येक ठिकाणी साफ सफाई ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. गांधी नगर, भोला नगर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, माहेश्वरी भवन या परिसरातील रस्त्याच्या कडेला असलेले मातीचे ढीग उचलून नियमित ते स्वच्छ ठेवण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच अनधिकृत फेरीवाले, टपऱ्या, खाद्यविक्रेते यांच्या कडून अस्वच्छता पसरत असल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्य विभागास देण्यात आले.
रस्त्याच्या दुभाजकांवरील झाडे यांना नियमित पाणी देण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच दुभाजकावर एकाच प्रकारची झाडे न लावता विविध प्रकारच्या फुलझाडांची लागवड करून त्यांच्या मातीची गुणवत्ता सुधारण्याच्या सूचना उद्यान विभागास देण्यात आल्या. त्याचबरोबर दुभाजके ही स्वच्छ ठेवून दुभाजकांच्या रंगरंगोटीचे काम पूर्ण करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्याचबरोबर रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांच्या भोवती लावण्यात आलेल्या कुंपणात कचरा टाकण्यात येतो तो साफ करून कचरा टाकताना आढळणाऱ्या व्यक्तीवर दंडात्मक कारवाई करून काही ठिकाणी झाडांचे कुंपण हे मोडकळीस आले आहेत ते तातडीने बदलून घेण्याचे निर्देश आयुक्त तथा प्रशासक श्री. दिलीप ढोले यांनी दिले.

