✒️ नितीन शिंदे, मुंबई महानगर प्रतिनिधी
भाईंदर:- परत कोरोना व्हायरसने आपले डोके वर काढले आहे. त्यामुळे आरोग्य विभाग सरकार हायॲलट वर आहे. पण या उपयोजना किती कारगर होईल हे वेळेवरच कळून येणार आहे. कोरोना व्हायरसचा संभाव्य धोका लक्षात घेऊन या पार्श्वभूमीवर मिरा भाईंदर महानगर पालिकेचे आयुक्त दिलीप ढोले यांनी कोरोना लसीकरणाला गती देण्याच्या सूचना आरोग्य विभागाला केल्या आहेत. पण महानगरपालिकेकडे असलेला लशीचा साठाच संपुष्टात आल्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून लसीकरण पूर्णतः ठप्प झाले आहे.
चीनमध्ये मोठ्या प्रमाणात वाढत असलेल्या कोरोनाचा भारताला धोका निर्माण होऊ शकते. त्यामुळे कोविड केंद्र सज्ज करण्यासह कोविड लसीकरणही वेगाने सुरु करण्याच्या सूचना आयुक्त दिलीप ढोले यांनी आरोग्य विभागाला दिल्या होत्या. त्यानुसार कोरोना लशीचा दूसरा डोस तसेच वरिष्ठ नागरिक व आरोग्य कर्मचारी यांना बूस्टर डोस देण्याचे काम सुरू करण्यात आले होते. पण तीन दिवसांपूर्वी आरोग्य विभागाकडे असलेला कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लशींचा साठा संपुष्टात आला आहे. त्यामुळे लसीकरण पूर्णपणे बंद पडले आहे. कोरोनाची भीती वाढल्यामुळे बूस्टर डोसची मागणी काही प्रमाणात वाढली होती. लसीकरण केंद्रावर दररोज साठ ते सत्तर व्यक्ती बूस्टर डोस घेण्यासाठी येत होते. मात्र आता लसच नसल्यामुळे या व्यक्तींना परत जावे लागत आहे.
कोरोना तयारीला आचारसंहितेचा अडथळा
संभाव्य लाटेचा धोका लक्षात घेऊन शहरातील सर्व कोविड केंद्र सुसज्ज करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत. त्यानुसार आवश्यक साहित्य सामग्री महापालिकेने खरेदी केली आहे. पण कोविड केंद्रासाठी आवश्यक असणारे कर्मचारी घेण्यासाठी अडथळा निर्माण झाला आहे. कोकण विभागीय शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता नुकतीच घोषित झाली आहे. २९ डिसेंबरपासून ही आचारसंहिता लागू झाली असून ती ४ फेब्रुवारीपर्यंत लागू राहणार आहे. आचारसंहितेमुळे महापालिकेच्या सर्वच निविदा स्थगित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे शहरातील विकास कामांवर त्याचा परिणाम तर होणार आहेच शिवाय कोरोनासाठी आवश्यक कर्मचारी घेण्यासही अडचण निर्माण झाली आहे.
लशींची आरोग्य विभागाकडे मागणी
कोविड लशीची मागणी आरोग्य विभागाकडे करण्यात आली आहे. लस उपलब्ध होईपर्यंत लसीकरण बंद करण्यात आले आहे. कोरोनाची लाट आचारसंहितेदरम्यान आलीच तर आपत्कालीन कायद्यातील तरतुदींनुसार आयुक्तांच्या अधिकारात कोविड केंद्रासाठी लागणारे कर्मचारी घेतले जातील, अशी माहिती वैद्यकीय आरोग्य विभागाचे उपायुक्त संजय शिंदे यांनी दिली.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348