✒️राज शिर्के, मुंबई (पवई) प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई, 7 जानेवारी:- कन्नड अभिनेता आणि दिग्दर्शक ऋषभ शेट्टी यांच्या कंतारा या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धमाका केला. हा चित्रपट अनेक भाषांमध्ये रिलीज झाला आणि प्रेक्षकांनीही चित्रपटाला मोठ्या प्रमाणावर पसंती दर्शवली. दक्षिण कन्नडच्या ग्रामीण भागातल्या लोककथेला घेऊन हा चित्रपट बनवण्यात आला. या चित्रपटातल्या एका सीनसारखीच घटना सत्यामध्येही घडली आहे, त्यामुळे पुन्हा एकदा हा चित्रपट चर्चेचा विषय ठरला आहे.
ही घटना कर्नाटक किनाऱ्याच्या भागात उडुपी जिल्ह्याच्या एका छोट्या गावात पदुबिदरीमध्ये घडली आहे. योगायोगाने कंताराच्या चित्रपटाचा सेटही इकडेच लावण्यात आला होता. ही घटना 500 वर्ष जुन्या जरांदिया मंदिराबाबत सुरू असलेल्या वादाशी संबंधित आहे, जिकडे मंदिर प्रशासनाच्या दोन समितींमध्ये वाद झाले आणि प्रकरण कोर्टात पोहोचलं.
या प्रकरणातल्या एका व्यक्तीचा रहस्यमयी परिस्थितीमध्ये मृत्यू झाला आहे. ही व्यक्ती कोर्टात जात असताना रस्त्यातच त्याचं निधन झालं. कंतारा चित्रपटातही एका व्यक्तीरेखेचा देवाचा शाप लागल्यानंतर एका वादात कोर्टात जात असतानाच मृत्यू झाल्याचं दाखवण्यात आलं होतं.
बंता सेवा समितीकडे पदुबिदरी जरांदिया मंदिराची देखरेख करण्याची जबाबदारी आहे. या सेवा समितीच्या सदस्यांमध्ये फेरबदल झाल्यानंतर संघर्ष झाला. सत्ता गमावल्यानंतर प्रकाश शेट्टी यांनी वेगळी ट्रस्ट बनवली. देवस्थानाचा एक तिरंदाज जया पुजारी यांना ट्रस्टचं अध्यक्ष करण्यात आलं. या प्रकरणी प्रतिवाद्यांनी धर्मस्थळावर आपला अधिकार बजावण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला.