✒️राज शिर्के मुंबई (पवई) प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- सम्राटकार बबनराव कांबळे यांच्या पश्चात दैनिक वृत्तपत्र सम्राटाची धुरा कोण सांभाळणार, अशी चिंता राज्यातील आंबेडकरी समाज, सम्राटचे वाचक, लेखक, पत्रकारांना पडली होती. परंतु बबन कांबळे यांच्या पुण्यानुमोदन व जलदान विधीचा कार्यक्रम रविवारी पार पडताच सोमवारी बबन कांबळे यांच्या सुविद्य पत्नी निलिमाताई बबन कांबळे यांनी सर्व दुःख पचवीत दै. ‘सम्राट’ची धुरा आपल्या खांद्यावर घेतली. मुलुंड येथील दै. सम्राटच्या मुख्य कार्यालयातील बबन कांबळे यांच्या प्रतिमेचे पूजन करून निलिमाताई कांबळे यांनी कामकाजाला सुरुवात केली. त्यामुळे निलिमाताई यांच्या निर्णयाचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.
दै. वृत्तरत्न सम्राटचे संपादक कालकथित बबनराव कांबळे यांचे अकस्मात निधन झाल्याने दै. वृत्तपत्र सम्राट या वृत्तपत्र, तसेच फुले शाहू आंबेडकरी चळवळीमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली. फुले, शाहू, आंबेडकरी विचारधारा ज्वलंत ठेवावयास लावणारे बबनराव कांबळे यांना या विचारधारेतील मान्यवरांनी, समाजाने कालच ठाणे येथे ही.के.पी. हॉलमध्ये आदरांजली वाहिली. दिवस येतो अन् जातो, परंतु कर्तृत्वान माणसाची आठवण मात्र कायम राहते. अशा कर्तृत्वान व्यक्तीमागे एक स्त्री असते. स्त्रीची पावित्र्यता, कोमलता भक्ती औदार्य, धैर्य, धीरोदात्तता या पवित्र सद्गुणांवरच पुरुषाला यश प्राप्त होते. दै. वृत्तपत्र सम्राटचे प्रथितयश संपादक कालकथित बबनराव कांबळे यांच्या यशामागे त्यांची आई व पत्नी यांचा सिंहाचा वाटा आहे. याचा प्रत्यय आज आला. कालकथित बबनराव कांबळे यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी निलिमाताई बबनराव कांबळे यांनी दै. वृत्तपत्र सम्राटच्या कार्यालयात दैनिक वृत्तपत्र सम्राटची धुरा आपल्या खांद्यावर घेतली. त्यांनी आजपासूनच सुरूवात केली.
निलिमा ताईंनी सर्वप्रथम सम्राटच्या कार्यालयातील प्रथम आपल्या पतीच्या फोटोचे दर्शन घेतले व कार्यालयीन कामकाजाला सुरुवात केली. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रा. सिंधुताई रामटेके, अंजली सोनवडेकर, आरती शिंदे, दिपश्री माने-बलखंडे, मनालीताई पवार, सत्यभामा खंडारे, विदिशा कुणाल कांबळे, सुप्रिया कुणाल कांबळे, कुणाल बबनराव कांबळे, कृपाल बबनराव कांबळे, पल्लवी बडेकर, भारती भोईर, भीमराव मोरे, दुष्यंत मोरे, डॉ. सुरेंद्र राजाराम शिंदे उपस्थित होते.
याप्रसंगी हर्षदा मनाली पवार यांनी सम्राटला ५०००/- रूपये व विपश्यनेवरील एक पुस्तक निलिमाताईंच्या हाती सुपूर्द केले. दिपश्री माने-बलखंडे ताईंनी सम्राटला ५०००/- रूपये व ‘रमाई’ हे पुस्तक भेट दिली. सदर प्रसंगी स्मृतीशेष बबनराव कांबळे साहेबांच्या जुन्या गोष्टींना उजाळा देण्यात आला. त्यामुळे भावना अनावर होऊन, सर्वांचे मन हेलावून, डोळ्यात अश्रू आले.
★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348